बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेतील CCTV फुटेजही गायब, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
मुंबई – बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बदलापूरच्या घटनेवर संताप व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकारला सत्तेची गुर्मी चढली आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण राज्यात प्रचंड वाढले आहे पण सरकार आपल्यात मस्तीत आहे. लाडकी बहिण म्हणून १५०० रुपये देण्यासाठी मोठ मोठे इव्हेंट केले जात आहेत पण बहिणींची सुरक्षा केली जात नाही. राज्य सरकार, गृहखाते, शासन आहे की नाही अशी परिस्थिती आहे. बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे पटोले म्हणाले.
दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जनआंदोलन केले पण ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न केला. राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. भाजपा युती सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट सरकार आहे या सरकारला जागे करण्यासाठी २४ तारखेला महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मविआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले..