ठाणे – ठाणे जिल्हयातील 41 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असून त्यांना नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ठाणे जिल्हयात एकूण 431 ग्रामपंचायती आहेत. यातील शहापूर तालुक्यातील-13 ग्रामपंचायती,मुरबाड तालुक्यातील -9 ग्रामपंचायती,कल्याण तालुक्यातील -7 ग्रामपंचायती,भिवंडी तालुक्यातील-6ग्रामंपचायती,अंबरनाथ तालुक्यातील -6 ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत उपक्रमात यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अलका परगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गीता काकडे यांच्यासह ठाणे जिल्हयातील तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.शिनगारे म्हणाले की, दि. 31 मार्च 2025 पर्यंत ठाणे जिल्हा क्षयरोगमुक्त झाला पाहिजे असे आपणास उद्दिष्ट देण्यात आले आहे. आपली सुरुवात चांगली झाली आहे. त्यामुळे आपले कौतुक करावेसे वाटते. क्षयरोगाचा कलंक आपण काढून टाकण्यामध्ये आपण यशस्वी झाला आहात. सामाजिक सुधारणा होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. आपला पल्ला खूप मोठा आहे आणि कालावधी खूप कमी आहे.
आतापर्यंत आपण 10 टक्के टप्पा पूर्ण केला आहे. उरलेला 90 टक्के टप्पा आपल्या पूर्ण करायचा आहे. क्षयरोग आपल्या गावात पुन्हा येवू नये, यासाठी दक्ष राहायला हवे. आपल्याला दिलेले उद्दिष्टे पूर्ण करायचे आहे. पहिल्या वर्षी आपल्या महात्मा गांधी यांचा कास्य रंगाचा पुतळा सलग दोन वर्षे असल्यास चंदेरी रंगाचा व सलग तीन वर्षे असल्यास सोनेरी रंगाचा पुतळा देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, सरपंच,आशा कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक केले.