पुणे – राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पुणे शहरातील कार्यरत असलेल्या महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळाकडून हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले.बदलापूर, लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांत झालेल्या महिला आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे.
अशा वेळी पीडित कुटुंबीयांना आधार देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी मात्र पीडित कुटुंबियांनीच मुलींकडे लक्ष द्यावे, अशी वक्तव्य केलेली आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक आणि निंदाजनक असल्याने चाकणकर यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी, तसेच राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर महिला अधिकारी कार्यरत असताना या घटनांकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, हे अशोभनीय आहे.