मुंबई – कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं. बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. महिलांना सुरक्षा पाहिजे म्हणून बंद केला. त्यात अडथळा आणला. गेल्या आठवड्यात भारत बंद झाला. इतर राज्यात रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते. तेव्हा बंदला विरोध केला नाही, असा सवालही ठाकरेंनी विचारला.
मुंबईत शिवसेना भवनासमोर ठाकरे यांच्या नेतृत्वात आज काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी संततधार सुरू असलेल्या पावसातही झालेल्या आंदोलनात रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांसह ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले, सरकारमध्ये हिंमत नाही. ते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. निर्ढावलेलं सरकार आपल्यावर राज्य करतंय. आजचं आंदोलन विकृती विरुद्ध संस्कृतीचं आहे. सरकार निर्लज्जपणे वागतंय, या सरकारला घालवावंच लागेल. आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल.आपापल्या गावागावात, शहरात ‘बहीण सुरक्षित, घर सुरक्षित’ अशी स्वाक्षरी मोहीम घ्या. आजपासून गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी स्वाक्षरी मोहिम राबवा.. या स्वाक्षऱ्या उच्च न्यायालयाला पाठवू हा बंद का करत होतो ते सांगू. सरकार आरोपीना पाठिशी घालणार असेल तर आम्ही आवाज उचलणारचं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले, सरकारकडून सर्व दार बंद झाली की रस्त्यावर उतरावं लागतं. संकटाचा सामना करण्याची हिंमत नाही. हे निर्ढावलेलं सरकार आहे. चेले चपाटे कोर्टात पाठवून बंदला विरोध केला. आम्ही कोर्टात गेलो न्याय कधी मिळेल ही आशा आहे. काल कोर्टात गेल्यावर तात्काळ निर्णय दिला. एका बाजूला बहिणीवर अत्याचार होतोय आणि एका बाजूला कंसमामा राख्या बांधत फिरतायंत.