कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय व लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने हा गुन्हा दाखल केला असून भ्रष्टाचाराचा तपास सुरू केला आहे. महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची भूमिका संशयास्पद आहे. सीबीआयने त्यांची सलग सहा दिवस चौकशी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआय चौकशीवेळी संदीप घोष यांची विधाने परस्परविरोधी आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय, एसीबीने गुन्हा नोंदवला आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही संदीप घोष यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यामुळेच संदीप घोष सीबीआयच्या तपासाच्या रडारवर आहेत. सीबीआयने संदीप घोष, आरोपी संजय रॉय आणि अन्य 4 डॉक्टर आणि एका सिव्हिल व्हॉलंटियरची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, तो विशेष न्यायालयाने मंजूर केला होता. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कोलकाता पोलिसांच्या ‘एसआयटी’ने आज, शनिवारी सकाळी निजाम पॅलेसमधील सीबीआय कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रे सोपवली.
कागदपत्रे मिळाल्यानंतर सीबीआयने संदीप घोष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला सीबीआयने अलिपूर सीजेएम कोर्टात आजच्या एफआयआरची प्रत आधीच सादर केल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. तसेच संशयित आरोपी संजय रॉय, माजी प्राचार्य संदीप घोष याच्यासह 7 जणांची शनिवारी पॉलीग्राफ चाचणी घेण्यात आली. त्याचबरोबर कॉलेजच्या 4 डॉक्टरांचीही आणि रुग्णालयातील सिव्हिल व्हॉलेंटियरची पॉलीग्राफ चाचणीही घेतली गेली.