जळगाव – लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचे अभियान नाही, पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचे महाअभियान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज रविवारी पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील ३० व देशातील ५० लखपती दिदींचे अनुभव,अडचणी ऐकून घेतले. त्यांनतर मोदींनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, आज लखपती दीदींचे जळगावात महासंमेलन होत आहे. गेल्या दोन महिन्यात ११ लाख लखपती दीदी बनल्या आहेत. आज देशभरातील सखी मंडळांसाठी ६ हजार कोटींहून अधिक रुपये जारी केले आहेत. या लखपती दीदींच्या माध्यमातून लाखो महिलांना मदत मिळणार आहे. माझ्या सर्व महिलांना शुभेच्छा आहे. मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचे आहे, असे म्हटले होते.
उद्या श्रीकृष्ण जयंती आहे त्यामुळे मी तुम्हाला आजच शुभेच्छा देतो, असे म्हणत त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.आजची गर्दी पाहून याठिकाणी महिलांचा महासागर उसळल्याचे दिसत आहे. आपल्या सगळ्यांकडे पाहून मला मला महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन होत असते. महाराष्ट्राचे संस्कार भारत नाही तर जगभरात पसरलेले आहे. मी कालच परदेश दौऱ्यावरून परत आलो आहे. मी युरोपच्या देशात पोलंड येथे गेलो होतो. तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन झाले.
पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप सन्मान करतात. इथे बसून तुम्ही याबाबतची कल्पनाही करू शकत नाही. तेथील राजधानीत एक कोल्हापूर मेमोरियल आहे. पोलंडच्या लोकांनी मेमोरियल कोल्हापुरातील लोकांची सेवा आणि सत्काराच्या भावनेने सन्मान देण्यासाठी बनवलेले आहे. काही लोकांना माहिती असेल की, दुसऱ्या विश्वयुद्धाच्या दरम्यान पोलंडच्या हजारो माता आणि बालकांना कोल्हापूरच्या राज परिवाराने शरण दिले होते. जेव्हा महाराष्ट्राची सन्मान कथा ऐकत होतो तेव्हा माझा माथा गौरवाने उंच झाला, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.