पुणे – गोकुळाष्टमीनिमित्त फुले खरेदीसाठी बाजारात रविवारी गर्दी झाली. फुलांना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. गोकुळअष्टमी सोमवारी (२६ ऑगस्ट) आहे. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. फुले खरेदीसाठी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी गर्दी झाली होती. मंडईतील हुतात्मा बाबू गेणू चौक परिसरात फुले खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. सुक्या फुलांना चांगली मागणी असून, फुलांच्या दरात वाढ झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
गोकुळअष्टमी विविध मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सजावट, तसेच पुजेसाठी फुलांना चांगली मागणी आहे. सोमवारी फुलांची आवक वाढणार आहे. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फुले विक्रीस पाठविली आहेत, असे भोसले यांनी सांगितले. घाऊक बाजारात फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे – झेंडू २० ते ८० रुपये किलो, गुलछडी (सुटी)- २०० ते ३०० रुपये किलो, अष्टर- जुडी २५ ते ३० रुपये, सुटी – १०० ते १५० रुपये, शेवंती – ८० ते १५० रुपये, गुलाब गड्डी – २० ते ३० रुपये, गुलछडी काडी – ५० ते ८० रुपये, डच गुलाब – ८० ते १३० रुपये, जर्बेरा – ६० ते ९० रुपये, कार्नेशियन – १५० ते २०० रुपये, शेवंती काडी – २५० ते ३०० रुपये, लिलियम (१० काड्या) – ८०० ते ९०० रुपये, ऑर्चिड – ४०० ते ५०० रुपये, जिप्सेफिला – १५० ते २०० रुपये, जुई – १००० ते १५०० रुपये भाव बाजारात बघायला मिळाले.