सयाजीरावचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना नरसिंहरावची आठवण आली

0

मुंबई – प्रेक्षकांची पसंतीस उतरलेली मालिका ‘पारू’ या मालिकेमध्ये अहिल्यादेवींच्या भावाची म्हणजेच सयाजीरावची एन्ट्री झाली आहे. मराठीताल लाडका अभिनेता सुनील बर्वे झी मराठीवर ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा पदार्पण करत आहे. या निमित्ताने सुनीलने झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता व्यक्त करताना सांगितले, “झी मराठीवर काम करण्याची उत्सुकता नेहमीच होती कारण झी मराठी मालिका विश्वातला पायनियर आहे आणि मी झी मराठी बरोबर एकदिलाने २०१२ पर्यंत काम केलंय. त्यामुळे एक आत्मीयता आहे, जशी दूरदर्शन केंद्रबद्दल आहे. जेव्हापासून प्रायव्हेट चॅनेलची सुरुवात झाली तेव्हापासून झी मराठीने अनेक कलाकारांच्या करियरला आकार देण्यास मदत केली आहे. तेव्हा पुन्हा झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता वेगळीच आहे. सयाजीरावच्या भूमिकेसाठी मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा सयाजीरावचा प्रोमो आला तेव्हा खूप जण म्हणत होते की नरसिंहराव परत आला. प्रेक्षकांना अजूनही माझी ११ वर्षापूर्वीची ‘कुंकू’ मालिका लक्षात आहे. मला खूप आनंद झाला की लोकांच्या हृदयात ती मालिका आणि माझी भूमिका अजून ही ताजी आहे.

मला जेव्हा ‘पारू’ मालिकेसाठी कॉल आला भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा काही तरी नवीन करायला मिळणार आहे याचा आनंद झाला. प्रेक्षकांना मला स्क्रीनवर पाहिल्यावर नरसिंहची आठवण आली असेल पण सयाजीराव, खूप वेगळा आहे. सयाजीराव जरी गावचा कर्ताधर्ता असला तरी, एक माणूस म्हणून नरम स्वभावाचा आहे आणि तोच वेगळेपणा मला या भूमिकेसाठी ऊर्जा देत आहे. आणखीन बोलायचे झालं तर सयाजीराव आपल्या तत्वांशी बांधलेला आहे, कुटुंबावरचं आणि त्याच्या बहिणीवरचं प्रेम तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. एकदम छान व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. पण त्याच्या मनात जर कोणाविषयी राग असेल तर तो व्यक्त ही होतो आणि त्या व्यक्ती पासून दूरही राहतो.

सातारामध्ये शूटिंग करण्याचा अनुभव ही वेगळा आहे. जेव्हा तुम्ही घरापासून दूर राहून शूट करता तेव्हा ती मालिकेची टीम तुमच्या परिवारासारखी होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आऊटडोअर काम करायची मज्जा असते तशीच मज्जा आहे. ‘पारू’च्या कलाकार टीममध्ये बहुतेक नवीन पिढी आहे त्यांच्या सोबत आणि त्यांच्या पद्धतींनी काम करण्याची मला उत्सुकता आहे. टीव्ही माध्यमात बराच बदल झाला आहे. ती काम करण्याची पद्धत मला आत्मसात करून घ्याची आहे. खूप उत्सुक आहे मी त्यांच्यासोबत काम करायला. मुळात सातारा शहर खूप सुंदर आहे. मी मनोरंजन दुनियेत ४ दशके पाहिली आहेत टीव्ही माध्यामात खूप बदल पाहिला आहे.

तंत्रज्ञानापासून ते दृष्टिकोनापर्यंत, क्रिएटिव्ह ते मार्केटिंगच वर्चस्वापर्यंत मी अनुभवलेल्या सर्व गोष्टी मनोरंजन दुनियेत अनेक वर्षांमध्ये पहिल्या आहेत. आताची पिढी या माध्यमाला सरावलेली आहे, त्यांचा कॅमेरासमोरचा आत्मविश्वास आणि आत्मीयता बघण्यासारखी आहे. त्यांच्या सोबत कामकारण्याची एक वेगळीच मज्जा आहे. मी नवीन गोष्टींसाठी नेहमीच उत्सुक असतो, बदल अपरिहार्य आहे असे मी मानतो आणि बदलाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. बदल कोणताही असला तरी तो सकारात्मकपणे घेतला पाहिजे. पण हे ही नक्की की मालिका, चित्रपट किंवा कोणतीही भूमिका करण्याच्या मुख्य ध्येयापासून आपण विचलित होता कामा नये. मी ही ‘पारू’ मालिकेत एका नवीन टीम सोबत, नवीन भूमिकेत काम करण्यासाठी आणि तुम्हा सर्वाना भेटण्यासाठी उत्सुक आहे.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech