मालवण-राजकोट येथील छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा कोसळला

0

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात झालेल्या नौदल दिनानिमित्त मालवण-राजकोट इथं आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी राजकोट इथं भेट देत पाहणी केली. आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली. शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या या घटनेचा शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech