पुणे – मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो, पण मी त्याचा गाजावाजा करीत नाही. पांडुरंगाचे दर्शन घ्यायला गेल्यानंतर जगाला कळावे याला काही अर्थ नाही. मी दर्शन घेतो दोन मिनिटे तिथे थांबतो आणि निघून जातो. याचे जे मानसिक समाधान असते ते प्रसिद्धीपेक्षा मोठे असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. पण मी गाजावाज न करता पांडूरंगाचे दर्शन घेतो. असे, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाच्या समारोप सोहळयात पवार बोलत होते.
यावेळी संमेलनाध्यक्ष व संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे उपस्थित हाेते. दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य वाटप, तसेच वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल वारकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.