नवी दिल्ली – केंद्रशासित प्रदेश असलेल्या लद्दाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलीय. राज्यात झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे असतील असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, सोमवारी जाहीर केले. यासंदर्भात अमित शाह म्हणाले की, केंद्र सरकार लद्दाखच्या लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. राज्यात झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे, प्रत्येक कोपऱ्यात प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतील असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरचे 5 ऑगस्ट 2019 रोजी 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. यानंतर लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश बनला. दुसरा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी याच दिवशी तत्कालीन राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले होते. केंद्रशासित प्रदेश असल्याने लद्दाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो. पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी देण्याबरोबरच, गृह मंत्रालयाने लडाख प्रशासनाला नवीन जिल्ह्यांशी संबंधित जसे की मुख्यालय, सीमा, रचना, पदांची निर्मिती आणि इतर कोणत्याही बाबींचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. या समितीने 3 महिन्यांत अहवाल सादर करायचा आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, लद्दाखचा केंद्रशासित प्रदेश या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाहीसाठी गृह मंत्रालयाकडे अंतिम प्रस्ताव पाठवेल.