राज्यसभेत एनडीने गाठला बहुमताचा आकडा

0

मतदानापूर्वीच विजयी झाले एनडीएचे 11 सदस्य

नवी दिल्ली –  भाजपप्रणीत एनडीए सरकारने राज्यसभेत पुन्हा बहुमताचा आकडा गाठला आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानापूर्वीच भाजपचे 9 आणि मित्रपक्षांचे 2 सदस्य बिनविरोध निवडून आले. या विजयासह भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ 96 झाले आहे, तर एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या आता 112 वर पोहोचली आहे.

राज्यसभेत अविरोध निवडून आलेल्या इतर 3 सदस्यांमध्ये एनडीएचा मित्रपक्ष राष्ट्रवादी(अजित पवार गट) आणि राष्ट्रीय लोक मंचचा एक सदस्य आहे. याशिवाय सत्ताधारी एनडीएला सहा नामनिर्देशित आणि एका अपक्ष सदस्याचाही पाठिंबा आहे. दरम्यान, काँग्रेसचा एक सदस्यही बिनविरोध निवडून आला आहे. दरम्यान, राज्यसभेत बहुमत मिळाल्यामुळे भाजपला अनेक विधेयकी मंजूर करुन घेणे सोपे होणार आहे. देशातील 9 राज्यांमधल्या 12 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

यामध्ये आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिशामधून ममता मोहंता, राजस्थानमधून रवनीत सिंग बिट्टू आणि त्रिपुरातून राजीव भट्टाचार्जी यांचा समावेश आहे. याशिवाय तेलंगणातून काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नितीन पाटील आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांचीही राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

राज्यसभेच्या एकूण 245 जागा आहेत. यापैकी सद्यस्थितीत 8 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 4 जम्मू-काश्मीरमधील आणि 4 नामनिर्देशित सदस्यांसाठी आहेत. सभागृहाचे सध्याचे संख्याबळ 237 आहे, त्यामुळे बहुमताचा आकडा 119 आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech