सिंधुदुर्ग – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी पुतळा उभारणी आणि सुशोभिकरणाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. ही सर्व कामे निकृष्ट झाली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी आज केली.
कणकवली येथील विजय भवन येथे श्री.नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, शिवरायांचा पुतळा ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे चांगला ठेकेदार नेमून पुतळा उभारता आला असता. परंतु पालकमंत्र्यांनी आपल्या मर्जीतील आणि कोणताही अनुभव नसलेल्या आपटे याला पुतळा उभारणीचा ठेका दिला. तसेच कोट्यवधी रूपये खर्च करूनही शिवरायांचा पुतळा पंचधातूचा केलेला नाही. अत्यंत कमी दर्जाचे साहित्य वापरून पुतळ्याची उभारणी करण्यात आली. त्यामुळे आठ महिन्यातच पुतळा कोसळण्याची नामुष्की ओढवली आहे.
आमदार नाईक म्हणाले, राजकोट येथील पुतळ्याचे नटबोल्ट गंजले असल्याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना २३ ऑगस्टला पाठवले. याचाच अर्थ बांधकाम विभागाला पुतळ्याच्या दूरवस्थेबाबत माहिती होती. परंतु बांधकाम विभागाने तातडीने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पुतळा कोसळण्याच्या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग देखील तेवढाच जबाबदार आहे.
बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुतळा उभारणीची कंत्राटे दिली. त्यामुळे पुतळा कोसळण्याच्या घटनेत ते देखील तेवढेच दोषी आहेत. त्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा. चव्हाण हे राजीनामा देईपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत.
पुतळा कोसळण्याच्या संपूर्ण घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. बांधकाम विभागामार्फतच संपूर्ण पुतळा उभारणीचे काम झाले होते. या दुर्घटनेला बांधकाम खातेच जबाबदार असल्याने आपण बांधकामचे कार्यालय फोडले. या प्रकरणी माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण मला त्याची पर्वा नाही असे नाईक म्हणाले.