पुणे – महाविकास आघाडीत पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसच्या वाट्याला तीन विधानसभा मतदारसंघ येतील. कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाला टक्कर दिली जाईल. कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंट मतदारसंघांत २०१९च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून गेले. गेल्या वर्षी कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून धंगेकर विजयी झाले होते. काँग्रेसकडून या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत पारंपरिक उमेदवारांना सोडून नव्या उमेदवारांना संधी देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात काँग्रेसकडून लढवण्यात येणाऱ्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. कसब्यातून रोहित टिळक यांना विचारणा करण्यात आली असली, तरी या ठिकाणाहून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचीच वर्णी लागेल, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.