इव्हेंटजीवी सरकार असल्याची सत्ताधाऱ्यावर टीका
सिंधुदुर्ग – मालवण येथे कोसळलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करावी, अशी मागणी शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली. दरम्यान सत्ताधारी सरकार हे इव्हेंटजीवी सरकार आहे. करोडो रुपये खर्च करायचे आणि नुसता दिखाऊपणा करायचा हे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. या सरकारच्या काळात झालेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. कोसळलेल्या पुतळा हे त्याचे एक उदाहरण आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला ठेस लागली आहे, असेही ते म्हणाले.
राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यांची पाहाणी करण्यासाठी पाटील बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पिळणकर, पुंडलिक दळवी, सायली दुभाषी, काशीनाथ दुभाषी, देवेंद्र टेमकर, सावली पाटकर, हीदायतुल्ला खान,नईम मेमन आदि उपस्थित होते.
पाटील म्हणाले, महाराष्ट्र सध्या भ्रष्टाचार बोकाळला असून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. लाडकी बहीण योजना तर इव्हेंट झाली असून, खात्यात पैसे पोचण्यापूवीच पैसे मिळाले का विचारत सुटले आहेत. सर्वच बाजूंनी सरकारची नाचक्की झाली आहे. त्यांना सर्व सामान्य जनतेचे सोयरसुतक राहिले नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत.
मालवण राजकोट किल्ला परिसरात छत्रपतींचा जो पुतळा उभारला तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आला आहे. मात्र आता नौदलाने हा पुतळा उभारला असे सागितले जात आहे. हा सर्व प्रकार अंग झटकण्याचा आहे. जयदीप आपटे यांच्यापर्यंत कोणी नेऊन सोडले? त्यांना मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव होता का? या सर्वाची चौकशी झाली पाहिजे. जबाबदारी झटकून चालणार नाही. अशी मागणी ही त्यांनी केली.
या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे का? असे विचारताच पाटील यांनी आजकाल निवृत्त न्यायाधीश हे चौकशी करायला दोन वर्षे लावतात त्यामुळे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते यांनी सांगतील त्यानाच चौकशी समिती नेमावी, असे आवाहन ही त्यांनी केले. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाच तेथील फरशी निघाल्या होत्या. त्यावरूनच यात भ्रष्टाचार किती झाला? हे जनतेने जाणून घ्यावे, हे सरकार इव्हेंटजीवी झाले आहे. अशी टिका ही पाटील यांनी केली आहे.