पवित्र स्थळाचे दगड पाडणारे ठाकरे हे महाराज द्रोही

0

सिंधुदुर्ग – राजकोट येथील भाजपा ठाकरे गटाच्या राड्या नंतर खासदार नारायण राणे यांनी नीलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर टीका केली. राजकोट किल्ल्याचे ठाकरे गटाने दगड पाडले ते माजी खासदार निलेश राणे यांनी लावले. या पवित्र स्थळाचे दगड पाडणारे ठाकरे हे महाराज द्रोही आहेत. महाविकास आघाडीने हा राडा घडवून आणला. आम्हाला जर काही करायचे असते तर यातील एकही मागे गेला नसता, असे नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी राणे म्हणाले, आम्ही राजकोट किल्ला येथे जाऊन घटनेची पाहणी करून येत होतो. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वातावरण खराब करण्याचे काम सुरु केले. त्यानंतर आम्ही आमच्या जागेवरच उभे राहिलो. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विरोधक या घटनेचे भांडवल करत आहेत. सध्या टीका करण्याचे कारण त्यांना भेटत नाही. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर धुरी, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, राजन गावकर, दादा साईल, सुदेश आचरेकर, राजू बिडये, राजू परुळेकर, यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुतळा कोसळण्याचे निमित्त करून महाविकास आघाडी टीका करत आहे. ज्यावेळी मालवण मध्ये पुतळा तयार झाला तेव्हा हे पुढारी कधी नतमस्तक व्हायला आले नाहीत. यांनी एखादी शाळा तरी काढली का ? मंदिर तरी उभारले का ? फक्त महायुती सरकारवर टीका करण्याचे काम करतात. स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी पैशाने बनविला त्या उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा ठेवणार ? शिव्या घालण्यापलीकडे त्यांना काही माहिती नाही. महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट झाला. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एक तरी उद्योग आणला का ? अशा माणसाने टिका करण्याचे धाडस करू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच लवकरात लवकर पुतळा उभारण्याचे प्रयत्न असतील, असे राणे यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech