शिवसेना मुख्य प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांची घोषणा.,.
मुंबई – अनंत नलावडे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते युवा खा.डॉ.श्रीकांत शिंदे हे उत्तर महाराष्ट्राचा जनसंवाद दौरा करणार असून यावेळी गुरुवार २९ ऑगस्ट ते शनिवार,३१ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात खासदार डॉ.शिंदे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत आणि विधानसभेच्या ३३ मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत,अशी घोषणा शिवसेना मुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते.त्यात शिवसेनेचे ७ खासदार निवडूनही आले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार महाराष्ट्राला पुढे नेण्याचेच काम करत असून आगामी विधानसभा निवडणुकीवर शिवसेना पक्षानेही आपले लक्ष केंद्रीत केले आहे.अशात उत्तर महाराष्ट्रातील तरुण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशीही संवाद साधून पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून खा.डॉ.शिंदे यांच्या दौऱ्याची उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारीही सुरु केल्याची माहितीही डॉ. वाघमारे यांनी दिली.
आपल्या जनसंवाद दौऱ्यात खा.डॉ. शिंदे उत्तर महाराष्ट्रातील ३३ विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत.त्यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघात मंत्री दादा भुसे आमदार आहेत.तरं जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आमदार आहेत.चोपडा मतदार संघात शिवसेनेच्या लता सोनावणे आमदार आहेत.एरंडोल मतदार संघात शिवसेनेचे चिमणराव पाटील आमदार असून पाचोरा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे किशोर पाटील आमदार असल्याचेही माहिती त्यांनी यावेळी दिली.
खा.डॉ.शिंदे यांच्या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होणार आहे.२९ ऑगस्ट रोजी जळगाव येथे सकाळी १० वा.मुक्ताईनगर मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.तरं सकाळी ११ वाजता एरंडोल-पारोळा, दुपारी १२ वाजता चोपडा आणि दुपारी १ वाजता पाचोरा भडगाव मतदारसंघाचा आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.त्यानंतर धुळे येथे सं.४ वाजता अक्कलकुवा मतदार संघ,सं.५ वाजता साक्री आणि सं.६ वाजता धुळे शहर मतदारसंघाची आढावा बैठक आणि पदाधिकाऱ्यांशी खा.डॉ.शिंदे संवाद साधतील, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
जनसंवाद दौऱ्यात दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्टला नाशिक येथे स.१० वा. देवळाली विधानसभा,स.११ वा. दिंडोरी पेठ, दु.१२ वाजता चांदवड-देवळा आणि दु.१ वा.निफाड मतदार संघाची आढावा बैठक घेण्यात येणार असून सं.४ वा.नांदगाव येथे शिवसृष्टी लोकार्पण कार्यक्रमाला खा.डॉ.शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत.जन संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी ३१ ऑगस्टला शिर्डी येथे स.११ वा. श्रीरामपूर आणि दु.१२ वा. नेवासा विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक होईल.त्यानंतर इगतपुरी मतदार संघाची आढावा बैठक सं.४ वा.पार पडेल,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात १५ आ.,अहमदनगर जिल्ह्यात १२ आ.,नंदुरबार जिल्ह्यात ४ आ.,धुळे जिल्ह्यात ५ आ.,तरं जळगाव जिल्ह्यात ११ आमदार असे एकूण ४७ आमदार उपस्थित असणार आहेत.