आंबा वाहतुकीसाठी सिंधुरत्न योजनेमार्फत अनुदान – पालकमंत्री

0

रत्नागिरी – आंबा वाहतुकीसाठी सिंधुरत्न योजनेमार्फत अनुदान देण्यात येणार असून, सप्टेंबरअखेरपर्यंत गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, आंबा बागायतदारांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. आंबा बागायतदारांना कर्जमाफीचा लाभ मिळावा आणि व व्याजात सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्यासंबंधी कार्यवाही करण्यात यावी. बँकांनी सिबिल स्कोअर विचारात न घेता आंबा बागायतदारांना कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच विविध योजनांचे लाभार्थी बँकेमध्ये येत असतात त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. याबाबत सर्व बँकांना अग्रणी बँकेने निर्देश द्यावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

वानर आणि माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे पुरविण्यात आले आहेत. सिंधुरत्न योजनेतून शेतकऱ्यांना कमी दरांमध्ये फवारणीसाठी औषधे, खते, अवजारे उपलब्ध करून दिली जातील. बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा लवकरच रत्नागिरीत उभारण्यात येणार असून, त्याकरिता सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. पणन विभागाने शेतकऱ्यांना हापूस जीआय मानांकन घेणे बंधनकारक करावे जेणेकरून हापूस आंब्यांचा बोगस व्यापार थांबविणे शक्य होईल. भरारी पथकांची नेमणूक करून कर्नाटक आंबा हापूस आंबा म्हणून विक्री करताना आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

बैठकीच्या अनुषंगाने येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन आंबा बागायतदारांसाठी कर्जमाफी व व्याजामध्ये सूट मिळण्याकरिता तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम देवेद्र. सिंह यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, कृषी पणन मंडळ उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे तसेच विविध बँकांचे आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, आंबा बागायतदार उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech