मुंबई – डॉ. निर्मल कुमार सोरेन हे भारतीय महसूल सेवेच्या (सीमाशुल्क व अप्रत्यक्ष कर) 1991 च्या तुकडीतील अधिकारी असून त्यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कोलकाता, दिल्ली, पाटणा, मीरत आणि मुंबई इथे कामाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नव्या पदाचा भार स्वीकारण्यापूर्वी डॉ. सोरेन हे मुंबई केंद्रीय सीजीएसटी आयुक्तालयाचे प्रधान आयुक्त होते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अखत्यारितील राष्ट्रीय उप विभाग (एसएनयू) (पश्चिम)च्या जीएसटी अर्थात वस्तू सेवा कर गुप्तवार्ता महासंचालक (डीजीजीआय) पदाचा भार डॉ. निर्मल कुमार सोरेन यांनी स्वीकारला.
डीजीजीआय ही केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळांतर्गत काम करणारी सर्वोच्च संस्था असून वस्तू सेवा कर चुकवेगिरीबाबत गुप्तवार्ता गोळा करणे, संकलित करणे आणि संबंधित विभागांपर्यंत पोहोचवण्याची तसेच केंद्रीय उत्पादनशुल्क आणि सेवा कराबाबत अखिल भारतीय पातळीवरील जबाबदाऱ्या या संस्थेकडे आहेत. डीजीजीआय, एसएनयू (पश्चिम) च्या प्रशासकीय अखत्यारित महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम प्रदेशाचा समावेश आहे. ही सर्व राज्ये अत्त्युच्च महसूल निर्मिती करणारे प्रदेश असल्यामुळे डीजीजीआय, एसएनयू (पश्चिम) ची भूमिका नियमन आणि महसूल गळती रोखण्यात महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर, अप्रत्यक्ष कर कायद्यांच्या अनुपालनात वाढ करण्यासाठीही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये डीजीजीआय, एसएनयू (पश्चिम) ने तपासात एकूण 1,06,346 कोटी रुपये वस्तू सेवा कर दायित्व उघडकीस आणले आहे.