मुंबई – भारतात केरळमध्ये मे महिन्यात मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर देशभरात जून महिन्यात मान्सून पोहोचतो. देशात यंदा मान्सून चांगलाच बरसत आहे. अनेक ठिकाणी पावसाने सरासरी गाठली आहे. भारतात यावर्षी सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के जास्त पाऊस पडला आहे. काही राज्यांत तर सरासरीपेक्षा ६६ टक्के जास्त पाऊस पडला आहे.सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा मान्सून सुरु होतो. परंतु यंदा ‘ला निना’च्या प्रभावामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सूनचा मुक्काम वाढणार असल्यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच खरीप लागवडीचे क्षेत्रही वाढणार आहे. कोकण विभागात ७ ते १२ सप्टेंबरच्या आठवड्यामध्येही पावसाची तीव्रता जास्त असणार आहे. उत्तर गुजरातवरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, उत्तर मध्य महाराष्ट्रात पावासाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वत्र यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठाही वाढला आहे. मान्सूनमुळे भारताचे ७० टक्के जलसाठे भरले जातात. सिंचनाशिवाय, देशातील जवळपास निम्मी शेतजमीन जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते.