नाना पटोले यांचा भाजपला इशारा…
मुंबई – अनंत नलावडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महाभ्रष्ट भाजपा युती सरकारला लाज वाटली नाही.मात्र जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली याचाच अर्थ त्यांनी चूक मान्य केली आहे.मात्र महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता यांना माफ करणार नाही,असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर माफिनाम्यावर बोलताना पटोले यांनी भाजपा सरकारचाही खरपूर समाचार घेतला.ते पुढे म्हणाले की,शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान असून त्याच स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता याची जबाबदारी घेऊन सत्तेतून पायउतार झाले पाहिजे अन्यथा जनता त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही,असाही इशारा पटोले यांनी दिला.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून विरोधकांनी राजकारण करु नये या एकनाथ शिंदे व फडणवीसांच्या आवाहनाला उत्तर देताना पटोले म्हणाले की,भाजपने केवळ मतांसाठीच महाराजांच्या नावाचा वापर केला असून सत्तेसाठी लाचार झालेला भाजपा कोणत्याही विषयाचे राजकारण करते. मविआचे सरकार खाली खेचण्यासाठी काय काय प्रकार केले हे देशाने पाहिले आहे.त्यामुळे दुसऱ्यांना सल्ला देण्याआधी त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात पहावा असा टोलाही पटोले यांनी यावेळी लगावला.