उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सक्त इशारा
मुंबई – अनंत नलावडे
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी वसतीगृहाच्या सुरक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक सुरक्षा व्यवस्था 24 तास उपलब्ध राहील,याची दक्षता सबधितांनी घ्यावी, अशा सूचना करतानाच यात जर दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा सक्त इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे दिला.
उच्च तंत्र शिक्षणविभागा अंतर्गत मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षे संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात एक बैठक संपन्न झाली.या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर,उपसचिव अशोक मांडे,उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक प्रकाश बच्छाव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की,वसतिगृहातील सुरक्षा महत्वाची असून पालक म्हणून संबंधित अधिकारी यांनी अधिक जबाबदारीने लक्ष द्यावे,वसतिगृहातील सुरक्षेची पाहणी आणि आढावा सातत्याने घेण्यात यावा.तसेच जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर वसतिगृहाच्या पालकत्वाची जबाबदारी देता येईल का याचाही विचार करावा, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. वसतीगृहाच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करणे आणि सुरक्षेसाठी विशेष काळजी घेणे आवश्यकच असून जर सुरक्षा पुरविण्यास दिरंगाई केली तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याचा पुनरुच्चारही मंत्री पाटील यांनी यावेळी केला.