मुरबाड : साई गोपाळ
श्रावण सुरू झाला की नागपंचमी पासून सणउत्सवांची लगबग सुरू होत श्रावणाचा आनंद द्विगुणीत केला जातो, सोबत शेतकरी कुंटूबांना शेतीकामांतून उसंत मिळते, या महिण्यात शेतकरी विविध धार्मिक ग्रंथांचे पारायण करुन आपला वेळ सत्कारणी लावण्याचा व धार्मिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात अध्यात्मिक ग्रंथांचे पारायण, ग्रामिण भागात जपलं जातंय धार्मिक परंपरेचा वसा…
मुरबाड-शहापुर तालुक्यांत दरवर्षी श्रावण महिन्यात शेतकरी बांधव धार्मिक-अध्यात्मिक ग्रंथांचे विधीवत पूजन करून ग्रंथपारायणाला सुरुवात करतात. संपूर्ण श्रावण महिना दिवसभरातील ३ ते ४ तास ईश्वरी लीलांचे वर्णन करणा-या ग्रंथाचे वाचन करण्याची परंपरा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड ,कल्याण, भिवंडी, अंबरनाथ या तालुक्यांतील गावागावात जोपासली जात आहे. यालाच ‘ अध्याय लावणे ‘ असे म्हणतात. रोज दुपारी व रात्री जेवणं आटोपल्यावर हे ग्रंथपारायण केले जाते.गावातील विशिष्ट व्यक्तीच्या घरी किंवा मंदिरात भाविक लोक जमतात व लयीत वाचन करणा-याकडून अध्याय विवेचन समजून घेतात.
अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या ग्रंथपारायणासाठी रामचरित्र सांगणारा रामविजय, कृष्णलीला वर्णन करणारा हरिविजय, संतमहती मांडणारा भक्तिविजय, महाभारतावर आधारित पांडवप्रताप, शिवलिलामृत, नवनाथ कथासार, डोंगरेमहाराज रचित तत्वार्थ रामायण, श्रीमद भागवतरहस्य, भगवतगीता, ज्ञानेश्वरी, सद्गुरुचरित्र, सिद्धांतबोध अशा ग्रंथांना प्राधान्य दिले जात आहे.प्रत्येक गावात विशिष्ट ठेक्यात ग्रंथवाचन करणारी माणसे मिळणे दुर्मिळ असल्याने अशा वाचकांना सन्मानाने अध्याय वाचनासाठी निमंत्रित केले जाते.श्रावणाच्या शेवटच्या दिवशी ग्रंथवाचनाचा समारोप करतांना छोटीशी पूजा करुन उपस्थितांना सुग्रास भोजन दिले जाते. यालाच “समाप्ती” म्हटले जाते. भातपिक तयार होण्यासाठी लागणा-या कालावधीत ईश्वर चिंतन करण्याच्या इराद्यानेच ही प्रथा जोपासली जात असल्याची माहिती शेतकरी बांधवांकडून देण्यात आली.” पवित्र श्रावण मासात ईश्वरचिंतन व्हावे व अध्यात्मिक ज्ञानात भर पडावी म्हणून आम्ही ग्रंथवाचन करत असतो .ग्रामीण भागात अनेक पिढ्यांपासून ही प्रथा जोपासली जात आहे. “