रत्नागिरी – जुलै महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको केल्याबद्दल माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, सचिन वहाळकर, चंद्रकांत राउळ यांच्यासह इतर चोवीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुलै महिन्यात एमआयडीसीमधील रस्त्यावर वासराची मान कापल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर रत्नागिरीत संतापाची लाट उसळली होती. ग्रामीण पोलीस ठाण्यावर सतत दोन दिवस नागरिकांनी आंदोलन करुनही पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नव्हती. याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून सात जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता.
या मोर्चात भर पावसात हजारोंच्ये संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार नीलेश राणे यांनी केले होते. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जेल नाका येथे लोकांनी उत्स्फूर्त रास्ता रोको करत जवळपास चार तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. आता मोर्चा काढून रास्ता रोको केल्याबद्दल पोलिसांनी निलेश राणे, बाळ माने, सचिन वहाळकर, चंद्रकांत राऊळ यांच्यासह सकल हिंदू समाजाच्या इतर २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले आहे.