हैदराबाद – तेलंगणातील भद्राद्री कोथागुडेम येथे आज, गुरुवारी पोलीसांशी झालेल्या चकमकीत 6 नक्षली ठार झाले असून चकमकीदरम्यान 2 पोलीस कर्मचारीही जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. कारकागुडेम मंडलातील रघुनाथपालेमजवळील जंगल भागात पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही चकमक झाली. दोन दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी दंतेवाडा आणि विजापूरच्या सीमेवरील जंगल परिसरात केलेल्या नक्षलविरोधी कारवाईत 9 नक्षलवाद्यांना ठार केले होते. यानंतर दोनच दिवसांनी 6 नक्षल्यांना ठार करण्याची घटना घडली आहे. या संयुक्त मोहिमेमध्ये विविध विभागातील विविध सुरक्षा तुकड्यांचा समावेश होता.
तेलंगणातील चकमकीत ठार झालेल्यांमध्ये सीपीआय (माओवादी) पक्षाच्या मनुगूरू क्षेत्र समितीचा सचिव लछन्ना याचा समावेश आहे. मनुगूरू क्षेत्र समितीचे सचिव असलेल्या लछन्ना यांच्या नेतृत्वाखालील नक्षलवादी गट गेल्या काही काळापासून छत्तीसगड- तेलंगणा सीमाभागात सक्रिय आहे. लछन्ना नुकताच छत्तीसगडमधून तेलंगणात स्थलांतरित झाल्याची माहिती होती.