खोडसाळ माहिती प्रसारित केल्याप्रकरणी हायकोर्टाची विकिपीडियाला अवमानना नोटीस
नवी दिल्ली – एका वृत्तसंस्थेच्या संदर्भात चुकीची आणि खोडसाळ माहिती प्रसारित केल्याप्रकरणी विकिपीडियाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केलाय. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने विकिपीडियाला आज, गुरुवारी अवमानना नोटीस बजावली आहे. काही अज्ञात लोकांनी विकिपीडियावरील पेजमध्ये वृत्तसंस्थेच्या संदर्भात आक्षेपार्ह माहिती टाकली होती. याचिकाकर्ती वृत्तसंस्था सरकारच्या प्रचाराचे साधन आहे, असा बदल त्यात केला होता. यानंतर न्यूज एजन्सीने तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने विकिपीडियाला पेज एडीट करणाऱ्या लोकांची माहिती देण्याचे आदेश दिले होते, परंतु विकिपीडियाने आदेशाचे पालन केले नाही, यामुळे वृत्तसंस्था पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचलीआणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचे सांगितले. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नवीन चावला यांनी विकिपीडियावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. कोर्ट म्हणाले की, “तुम्हाला भारत आवडत नसेल, तर कृपया भारतात काम करू नका. आम्ही सरकारला विकिपीडिया भारतात ब्लॉक करण्यास सांगू.” अशा कठोर शब्दात न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने आदेशाचे पालन का केले नाही..? अशी विचारणा विकीपिडीयाला केली. न्यायालयाने यापूर्वीच विकिपीडियाला न्यूज एजन्सीच्या पेजमध्ये बदल करणाऱ्यांची नावे विचारली होती. पण, अद्याप ही नावे समोर आलेली नाहीत. यावर विकिपीडियाच्या वकिलाने सांगितले की, संस्थेचे बेस भारतात नाही, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्यास वेळ लागेल. त्यावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने अवमानाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. न्यायालय म्हणाले की, विकिपीडियाचा बेस भारतात आहे की नाही हा प्रश्न नाही, तर न्यायालयाच्या आदेशाचे पालन का झाले नाही, हे महत्त्वाचा आहे. आम्ही सरकारला सांगून भारतात तुमचे काम बंद करू, तुमचे व्यावसायिक व्यवहार बंद करू, असा इशाराही न्यायालयाने दिला. आता या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.