ठाणे – स्वच्छ व सुंदर ठाणे हे आता बदलले वाहतूक कोंडीचे ठाणे बनले असल्याने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आज पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना वाहतूक कोंडीवर उपाययोजना तात्काळ करा नाहीतर जन आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा थेट इशाराच पत्राद्वारे दिला आहे. या पत्रात वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय जटील होत चालला आहे. दरम्यान कोंडी कमी करण्याऐवजी प्रशासनातील अधिकारी महसूल गोळा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी केला. यासंदर्भात वारंवार प्रशासनाला कळवून देखील त्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे यावेळी विचारे यांनी सांगितले.
गेल्या ४ वर्षापासून ठाण्याच्या घोडबंदर रोडवर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भरलेले खड्डे पुन्हा पूर्ववत होतात. दरम्यान सर्व्हिस रोड मोकळे नसल्याने खड्ड्यांमुळे व निमुळत्या रस्त्यामुळे हायवे पूर्वद्रुतगती महामार्गावर एकामागून एक वाहने उलटून अपघात होत आहेत. ही वाहने तत्काळ उचलून घेण्याऐवजी वाहने त्याच ठिकाणी अनेक दिवस पडून असतात असे यावेळी राजन विचारे यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे. तसेच या सणासुदीच्या काळात सुद्धा ही वाहतूक कोंडी कमी करण्याऐवजी प्रशासकीय अधिकारी महसूल गोळा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून हायवे पूर्वद्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. असे या पत्रामध्ये म्हटले आहे.
त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्यातील असल्याने शहरात फिरत असताना शहरातील अंतर्गत रस्ते सुद्धा बंद केले जातात. तसेच ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांवर डिव्हायडर व रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे रस्ते छोटे झाल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. सध्या ठाण्यातील राजकारण्यांच्या नातेवाईकांना, स्वीय सहाय्यकांना तसेच चिल्लर पदाधिकाऱ्यांना देखील पोलीस सुरक्षा देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिलेली सुरक्षा कमी करून तेच मनुष्यबळ ठाण्याच्या नाक्या-नाक्यावर तैनात करावेत अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.