पश्चिम-मध्य रेल्वेच्या जबलपूर स्थानकावर झाला अपघात
जबलपूर – मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये आज, शनिवारी सकाळी रेल्वे अपघात झाला. सोमनाथ एक्स्प्रेस गाडी फलाटावर पोहोचण्याच्या अवघ्या 200 मीटर आधी 2 डबे रुळावरून घसरले.त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवान या अपघातात आतापर्यंत कुठल्याही जीवितहानीचे वृत्त नाही. या अपघातासंदर्भात पश्चिम मध्य रेल्वेचे सीपीआरओ हर्षित श्रीवास्तव यांनी सांगितले की, आज, शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमाराला सोमनाथ एक्स्प्रेस (गाडी क्र. 2291) ही ट्रेन इंदूरहून जबलपूरकडे येत होती. ट्रेन जबलपूर प्लॅटफॉर्म क्रमांक-6 च्या दिशेने जात होती. गाडी थांबणार असतानाच अचानक तिचे दोन डबे रुळावरून घसरले. या ट्रेनचा वेग खूपच कमी होता, त्यामुळे प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून ते आपापल्या घरी रवाना झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ साबरमती एक्सप्रेसचे 22डबे रुळावरून घसरले होते.