मुंबई – दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणा-या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी कन्याकुमारी येथील प्रसिध्द स्वामी विवेकानंद स्मारकाची ५२ फुट उंच हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. तर यावेळी हैद्राबाद येथून आणण्यात आलेल्या दिव्याची रोशणाई तरुणाईचे आकर्षण ठरणार आहे.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे 28 वे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिध्द मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते. गतवर्षी उज्जेन येथील महाकाल मंदिर तर त्यापुर्वी केदारनाथ मंदिर, पशुपतीनाथसह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर, शिर्डिचे साई समाधी मंदिर अशी विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकामन्य बाळा गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मिय सहभागी होतात आणि मोठया उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही त्याचे वैशिष्ट. तसेच दरवर्षी चित्रपट, क्रिडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जुन येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे.
विवकानंद स्मारक हे वावातुराई, कन्याकुमारी येथील पवित्र स्थान आणि प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे . हे स्मारक भारताच्या दक्षिण टोकापासून ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर आहे. विवेकानंद स्मारक समितीने इ.स. १९७० स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले. स्वामी विवेकानंद डिसेंबर १८९२ मध्ये याच खडकांवर ध्यानास बसले होते. तर लोकसभा निवडणुकी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही याच मंदिरात ध्यानधारणा केली होती.
त्याच मंदिराची हुबेहुब प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्यात आली आहे. यासोबतच या संपुर्ण परिसरात हैद्राबाद येथून आणण्यात आलेल्या दिव्यांची खास रोशणाई करण्यात आली असून तरुणांसाठी ही रोशणाई खास आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी मंदिर आणि ही रोशणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी होते तसेच याही वर्षीची आरास गणेशभ्क्तांना नक्की आवडेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे.