ठाणे – घोडबंदर रोड परिसरातील गणेशभक्ताना गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन खोल पाण्यात करता यावे, यासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा व समाजसेवक डॉ. किरण मणेरा यांनी वाघबीळ रेतीबंदर येथील खाडीत १०० फूट लांब रॅम्प उभारला आहे. या रॅम्पच्या साह्याने गणेशमूर्तींचे खोल खाडीत विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच ठाणे शहरातील गणेशभक्तांना विसर्जनासाठी या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले. ठाणे शहरातील गणेशमूर्तींचे शहरातील तलाव व खाडीकिनाऱ्यावर विसर्जन केले जाते. मात्र, भरतीच्या वेळी गणेशमूर्तींचे खोल पाण्यात विसर्जन करण्यात अडचणी येतात. गेल्या काही वर्षांपासून वाघबीळ रेतीबंदर परिसरात भाविकांना भरतीमुळे खाडीच्या किनाऱ्यावरच विसर्जन करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा व समाजसेवक डॉ. किरण मणेरा यांनी पुढाकार घेऊन वाघबीळ रेतीबंदर येथे १०० फूटी रॅम्प तयार केला. या रॅम्पमुळे भरतीच्यावेळीही नागरिकांना खोल खाडीत विसर्जन करता येणार आहे.