नवी मुंबई – संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव नवी मुंबईतही मोठया प्रमाणात साजरा होत असून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणपूरकतेची कास धरत ‘इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करावा असे आवाहन मागील महिन्यातच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. आयुक्तांनी केलेल्या आवाहनास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नागरिकांनी पर्यावरणाची जपणूक करण्याच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करता पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी तसेच श्रीमूर्तींचे विसर्जन नैसर्गिंक जलस्त्रोतात न करता महानगरपालिकेने ठिकठिकाणी निर्माण केलेल्या 136 कृत्रिम विसर्जन तलावात करावे असे आवाहन आयुक्तांमार्फत करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे श्रीगणेशोत्सवाच्या सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून कापड, कागद अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करावा तसेच कर्णकर्कश्य ध्वनी टाळून मर्यादित आवाजात वाद्यांचा वापर करावा तसेच लेझर लाईटचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नसून 5 वर्षांसाठी परवानगीचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. मंडप परवानगीसाठी ई सेवा संगणक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्याने 176 गणेशोत्सव मंडळांनी सुलभ रितीने परवानगी प्राप्त करून घेत समाधान व्यक्त केले आहे. इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळांना आवाहन करताना श्रीगणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ विसर्जनस्थळे उपलब्ध व्हावीत याची खबरदारी घेत 136 इतक्या मोठया प्रमाणावर कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.
या कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी कृत्रिम तलाव उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये बेलापूर विभागात 19, नेरुळ विभागात 26, वाशी विभागात 16. तुर्भे विभागात 17, कोपरखैरणे विभागात 15, घणसोली विभागात 15, ऐरोली विभागात 18 व दिघा विभागात 10 अशाप्रकारे एकूण 136 कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत. नागरिकांनी प्राधान्याने कृत्रिम विसर्जन तलावांचाच वापर करावा असे आवाहन विविध माध्यमांतून करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 22 पारंपारिक विर्सजन स्थळे असून त्याठिकाणी होणारी भाविकांची गर्दी विभागली जावी व एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता मागील काही वर्षांपासून कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. कृत्रिम तलावांमुळे नैसर्गिक जलस्तोतांतील जलप्रदूषणाला प्रतिबंध होऊन त्यांचे प्रदूषण कमी होत असते. नवी मुंबई हे स्वच्छ शहराप्रमाणेच पर्यावरणशील शहर म्हणून नावाजले जात असून या इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमुळे पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने एक सकारात्मक यशस्वी पाऊल उचलले जात आहे. या कृत्रिम तलाव संकल्पनेला नागरिकांचा मिळणारा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. तरी पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीमूर्ती शाडूची व पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे श्रीमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे अथवा नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.