मुंबई – “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता वाढवणारा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत.
अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे, गणेश पवार अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे. त्याशिवाय हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते लिलीपुट या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. कॅमेरामन म्हणून पराग देशमुख आणि नितीनचंद्र बांदेकर यांनी काम पाहिले आहे. वैभव जोशी, प्रवीण दवणे, अवधूत गुप्ते, संतोष पवार यांनी लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते, जितेंद्र कुलकर्णी, रविराज कोलथरकर यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, सचिन पिळगांवकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभु अरोरा, विभावरी जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. दीपाली विचारे, सॅड्रिक डिसोझा, अजिंक्य शिंदे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
“नवरा माझा नवसाचा 2” का तर पहिल्या भागात एक जोडपे होते या भागात दोन जोडपी आहेत, डबल धमाका, मनोरंजन या चित्रपटात अनुभवता येणार आहे तसेच गणपती बाप्पाचा डबल आशिर्वाद आहे. या चित्रपटात भक्ति, श्रद्धा या दोघी असून अर्थात भक्ति माझी बायको असून श्रद्धा माझी मुलगी आहे आणि या दोघींची गणपती बाप्पावर खुप भक्ति आणि श्रद्धा आहे. मनोरंजनासोबतच या चित्रपटात एक लव्हस्टोरी पण आहे. मला वाटत की खुप कालावधीनंतर फॅमिलीसोबत पाहण्यासारखा चित्रपट येतोय तेव्हा तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा असे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.
“नवरा माझा नवसाचा 2” मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का ? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नवस फेडण्यासाठीच्या रेल्वे प्रवासात हिरे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाचं कथानकही उलगडणार आहे. त्यामुळे मनोरंजक आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. उत्तम गोष्ट, दमदार अभिनय, खुसखुशीत संवाद, श्रवणीय संगीत अशी मनोरंजनाची पुरेपूर मेजवानी या चित्रपटातून अनुभवायला मिळणार असून अजूनही काही सरप्राइज गोष्टी या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार असून त्यासाठी प्रेक्षकांना केवळ २० सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.