नवी दिल्ली – प्रत्येक व्यक्तीने किमान एका व्यक्तीला साक्षर करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केले आहे. “जेव्हा आपण एखाद्याला साक्षर बनवतो, आपण त्याला किंवा तिला मुक्त करतो, आपण त्या व्यक्तीला स्वतःला शोधण्यात मदत करतो, आपण त्याच्या किंवा तिच्या मनात सन्मानाची भावना निर्माण करतो, आपण अवलंबित्व कमी करतो, आपण स्वातंत्र्य आणि परस्परावलंबन निर्माण करतो. शिक्षण एखाद्या व्यक्तीला स्वतःची मदत करण्यास सक्षम बनवते. हा लक्षात घेण्याजोगा एक सर्वोच्च पैलू आहे”, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
उपराष्ट्रपती आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते. “एखाद्या व्यक्तीला, मग तो पुरुष असो, स्त्री, लहान मूल किंवा मुलगी असो, तुम्ही एखाद्या व्यक्तीला शिक्षित करून दिलेला आनंद आणि समाधान मोजण्याच्या पलीकडे आहे, हे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. यामुळे तुम्हाला किती आनंद होईल याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. यामुळे आनंदाचा प्रसार सकारात्मक पद्धतीने होईल, असेही ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीला शिक्षित करणे हे मानव संसाधन विकासामध्ये तुम्ही करू शकत असलेली सर्वात मोठी सकारात्मक कृती असेल” असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात साक्षरतेला चालना देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. 100 टक्के साक्षरता लवकरात लवकर सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्धता आणि उत्कटतेने मिशन मोडमध्ये काम करण्याची वेळ आली आहे, आणि तसे केल्यास आपण विचार करतो त्यापेक्षाही आधीच हे उद्दिष्ट साध्य होईल याची मला खात्री आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. आपण प्रत्येकजण किमान एका व्यक्तीला साक्षर करूया, हे विकसित भारतासाठी महत्त्वाचे योगदान असेल, असेही ते म्हणाले.
“शिक्षण हे असे धन आहे जे कोणताही चोर तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. कोणतेही सरकार तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. कोणताही नातेवाईक किंवा मित्र ते तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत. त्यात कोणतीही कपात होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही ते सामायिक करत राहाल तोपर्यंत ते वाढत जाईल आणि वाढतच जाईल.” असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. साक्षरतेचा उत्कटतेने पाठपुरावा केल्यास भारताला नालंदा आणि तक्षशिला सारखे शिक्षणाचे केंद्र म्हणून आपले प्राचीन स्थान लवकरच पुन्हा प्राप्त करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.