नवी दिल्ली – मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. मराठा समाज अनेक वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहे. तर समाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा होती.
मराठा समाजाला २०१९ मध्ये एसईबीसी हे शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्यात आले होते. हे आरक्षण उच्च न्यायालयात वैध ठरले होते. सर्वोच्च न्यायालयाने मात्र मराठा आरक्षण रद्द केले होते. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, यासाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर आता ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.