– अमित शाहांच्या महायुतीतील नेत्यांना सूचना
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातील चुका टाळा. विधानसभेच्या उमेदवारांची निवड करताना विनिंग मेरिट हाच निकष डोळ्यांमसोर ठेवा, अशा सूचना अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह प्रमुख नेते उपस्थित होते.
याशिवाय, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नका, अशी सक्त ताकीदही शाह यांनी नेत्यांना दिली. या बैठकीत अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्या भागात किती आणि कधी सभा घ्यायच्या, याबाबतच्या नियोजनासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह यांनी भाजपच्या काही नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे.
अमित शाहांनी महायुतीच्या बैठकीत सांगितले की, महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आणू नका, जाहीर वाद टाळा, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळा, जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निवडा, विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या, महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा, एकजूट दिसेल, याची काळजी घ्या, राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि भाजपच्या ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही, त्या जागांबाबत योग्य निर्णय घ्या.