मुंबई – राज्यातील ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने स्वतःचा हिस्सा म्हणून ५० कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले असून गृह विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णयच जारी केला.या निर्णयामुळे पात्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना योजनांचा लाभ मिळण्यास आता सुरुवात होणार आहे.
१६ मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सरकारनेही या महामंडळाला शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे नाव दिले आहे.हे महामंडळ स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावे या हेतूने राज्य सरकारने आपल्या वाट्याचा हिस्सा अनुदान म्हणून महामंडळाला ५० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.आता हा निधी महामंडळात जमा करण्यासाठी परिवहन आयुक्तांना आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.