* हजारो महिलांची कुचंबणा
* अधिकाऱ्यांची दिरंगाई आणि ढिसाळ कारभार
* पाहणी दौऱ्यात आ.संजय केळकर यांचा संताप
ठाणे – बाळकुम परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रसूतीगृहास अवकळा आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा आणि दिरंगाईचा निषेध आमदार संजय केळकर यांनी केला आहे. बाळकुम पाडा-१ मध्ये ठाणे महापालिकेचे तळ अधिक एक मजली प्रसुतिगृह असून ते सुमारे ३५ वर्षे जुने आहे. येथे १० रुग्णशय्या असून बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे, मनोरमा नगर, मानपाडा, आझाद नगर आदी भागातील शेकडो महिलांना या प्रसुतीगृहाचा लाभ होत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून या वास्तुस अवकळा आली असून, स्लॅब कोसळणे, पाणी गळती, अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्याचा फटका गर्भवती महिलांना बसत आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या.
आमदार संजय केळकर यांनी या वास्तूची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून केळकर हे याबाबत पाठपुरावा करत असल्याने दुरुस्तीसाठीचा निधी देखील वर्ग करण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांची अक्षम्य दिरंगाई आणि ढिसाळ कारभार यामुळे या वास्तूची देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही, परिणामी ती धोकादायक झाली. सद्यस्थितीत ही वास्तू बंद ठेवण्यात आल्याने शेकडो महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे. आमदार संजय केळकर यांनी नुकतीच या प्रसूती गृहाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केला. हे प्रसूतीगृह तातडीने मुल्लर हॉल येथे हंगामी तत्वावर स्थलांतरीत करण्याची मागणी केळकर यांनी केली. यावेळी पाहणीदरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी तन्मय भोईर, निलेश पाटील, रविराज रेड्डी, सचिन शिनगारे, राकेश जैन, मयूर भोईर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून मी याबाबत पाठपुरावा करत आहे. हे प्रसुतीगृह नव्याने भव्य स्वरूपात उभारण्यासाठी मी बाळकुम ऑक्ट्रॉय नाका येथे पर्यायी जागा देखील सुचवली होती. मात्र अधिकाऱ्यांनी नवीन प्रसुतीगृहाला प्राधान्य न देता एका संस्थेला ती जागा दिली. हा निर्णय अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली घेतला? असा प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला.