मुंबई – प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिराकडे जाणारा व्हीआयपी रस्ता आज (१२ सप्टेंबर)सकाळी अचानक खचला, त्यामुळे एक कार तब्बल २० फूट खाली खड्ड्यात गेली. या धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रस्ता खचण्याचे कारण शोधत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी पडलेला खड्डा मोठा असून, तो वाहनांसाठी धोकादायक ठरला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रस्त्याची परिस्थिती गंभीर आहे. गणेशोत्सवाच्या काळात सिद्धीविनायक मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटलं, की रस्ता खचल्याची ही पहिली घटना नाही. पाण्याच्या लाईन लीक होणे आणि अन्य कारणांमुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होते. सरकारची काम करण्याची इच्छाशक्ती नाही, म्हणूनच अशा समस्या वारंवार समोर येतात. प्रभादेवी परिसरातील हा रस्ता सिद्धीविनायक मंदिरासह अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसकडे जातो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर मोठी वाहतूक असते. त्यामुळे रस्ता खचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबईकरांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागला.
मुंबई महानगरपालिकेने तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. या घटनेने मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे, आणि प्रशासनाची कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह केले जात आहे.