रायगड – जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीमध्ये साधन नायट्रो केमिकल कंपनीत स्फोट होऊन तीन कामगार ठार झाले आहेत. स्फोट इतका जोरदार होता की एक किलोमीटरच्या परिसरात त्याचा आवाज ऐकू आला. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या टीमने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. कंपनीत नेमका स्फोट कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.
ही दुर्घटना रायगड जिल्ह्यातीलच महाड एमआयडीसीतील स्फोटाच्या घटनेची आठवण करून देते. तिथे ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत स्फोटामुळे आग लागली होती आणि सात कामगारांचा मृत्यू झाला होता. आता या नव्या स्फोटामुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. धाटाव एमआयडीसीतील स्फोटानंतर परिसरात सावधगिरीचे वातावरण आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे आणि कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थांची चौकशी केली जात आहे. या दुर्घटनेने औद्योगिक सुरक्षेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.