कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपावर गेलेल्या कनिष्ठ डॉक्टरांशी आजही राज्य सरकार चर्चा करू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगाल सरकारने आंदोलक डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते. पश्चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांशी चर्चा होऊ न शकल्याने नाराज झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. डॉक्टरांना न्याय नको माझा राजीनामा हवा अशा शब्दात बॅनर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगाल सरकारने आंदोलक डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते. आंदोलक डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जीही तेथे पोहोचल्या होत्या. त्यांनी संपकरी डॉक्टरांशी बोलण्यासाठी 2 तास वाट पाहिली मात्र डॉक्टर चर्चेला आलेच नाहीत. या गोंधळानंतर ममता बॅनर्जी यांनी, ‘मी हात जोडून बंगालच्या जनतेची माफी मागते. आम्ही डॉक्टरांना कामावर परत आणू शकलो नाही. त्यांना न्याय नको माझी खुर्ची हवी आहे. जनतेच्या हितासाठी राजीनामा देण्यास तयार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. वास्तविक, ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांना बैठकीसाठी बोलावले होते. 15 कनिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, बैठकीच्या थेट प्रक्षेपणावर राज्य सरकारने बंदी घातली होती. यामुळे ज्युनिअर डॉक्टर बैठकीच्या ठिकाणी पोहोचले मात्र आत गेले नाहीत. ममता बॅनर्जी 2 तास तिथे थांबल्या. थेट प्रक्षेपणाशिवाय बैठक घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला.