मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप योग्य मार्गावर चालू आहे. मविआच्या जागा वाटपाच्या चर्चा अनंत चतुर्दशी नंतर पुन्हा सुरू होतील. मविआची प्रचार मोहीम कशी असेल याबाबतचा निर्णय देखील त्यानंतर घेण्यात येईल. महाराष्ट्रात तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता असल्याबाबतच्या प्रश्नावर थोरात म्हणाले की, भाजपचं राजकारण अशाच प्रकारचं आहे, ते थेट लढत नाहीत. आमची आतापर्यंत 125 जागांवर सहमती झाली. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 180 जागा जिंकेल, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. ते एका मुलाखतीत बोलत होते.
मतांचं विभाजन करुन विजय मिळवण्यासाठी ते अशा गोष्टी करतात. भाजपकडून असे प्रकार अनेक वर्षे केले जात आहेत. मात्र, यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होईल, असंही त्यांनी म्हटलं. महायुतीच्या पक्षांमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच आहे, प्रशासकीय प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय, भाजपचा मित्रपक्षांच्या जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत लोक या सर्व गोष्टी पाहत आहेत, असं देखील थोरात म्हणाले.