सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथील मतदार संघात भाजपची मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला आपले काम दाखवण्यासाठी जो तो आपल्या परीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांना डॅमेज करण्याचा प्रश्नच नाही. त्यांचे तसे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही संघटना वाढीला महत्त्व देत आहोत, असे स्पष्टीकरण भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले. सावंतवाडीत डझनभर उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. ही वस्तूस्थिती आहे आणि ते पक्षाच्या दृष्टीने चांगले आहे. मात्र, पक्ष आदेश आल्यानंतर डझनचे एक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सावंत यांनी आज या ठीकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, प्रमोद सावंत, सुहास गवंडळकर, सुधीर दळवी, महेश धुरी, विनोद सावंत, मधुकर देसाई आदी उपस्थित होते.
आठवडाभरापुर्वी मंत्री दीपक केसरकर यांनी आपले वरिष्ट नेत्यांशी चांगले संबंध आहे. परंतु भाजपातील काही स्थानिक लोक आपल्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केला होता .याबाबत सावंत यांना विचारले असता सावंतवाडी मतदार संघात अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे आपण केलेले काम दिसावे यासाठी जो तो आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. त्याचा फायदा मतदार संघातील लोकांनाच होत आहे. त्यामुळे काम करणे याचा अर्थ कोणाला त्रास देणे डॅमेज करणे असा होत नाही. त्यामुळे केसरकर यांनी केलेल्या टिकेला महत्व नाही त्यांनी आपल्या पध्दतीने काम करावे.
खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडीतील एका कार्यक्रमात हा मतदार संघ लढण्यासाठी डझनभर उमेदवार इच्छुक आहेत, असे विधान केले होते. याबाबत सावंत यांना छेडले असता या मतदार संघात संघटना मोठी आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र वरिष्टांचा आदेश आल्यानंतर बाराचे एक होतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या विरोधात संविधान बदलण्याचे प्रयत्न आहेत. असा आरोप करणार्या राहूल गांधी यांनी विदेशात झालेल्या एका कार्यक्रमात आपली सत्ता आल्यास संविधान बदलण्यात येणार आहे, असे विधान केले. याचा अर्थ त्यांची भूमिका दुटप्पी आहे आणि त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे ते म्हणाले.