सिंधुदुर्ग – सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेनंतर जिल्ह्यात फिरतात, पण कार्यकारी बांधकाम अभियंता अजयकुमार सर्वगोड मात्र फरार आहेत. जे सर्वगोड पुतळा उभारताना सातत्याने माध्यमांसमोर येवून बोलत होते, ते गेले कुठे? पुतळा बनवताना बांधकाम मंत्र्यांचे स्वीयसहाय्यक अनिकेत पटवर्धन व सर्वगोड सातत्याने रसायनी मध्ये फॉस्को कंपनीत का जात होते ? एवढी दूर्घटना घडूनही कार्यकारी अभियंता यांची कुठलीही चौकशी होत नाही. म्हणजेच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी कार्यकारी अभियंत्यांची पार्टनरशिप आहे, असा थेट आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याल्यानंतर उपअभियंता तक्रार देतो आणि कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड फरार आहेत. माझ्या माहिती प्रमाणे शिल्पकार आपटेला काम अनिकेत पटवर्धन आणि सर्वगोड यांनी दिले. रसायनी मध्ये फॉस्को कंपनीत काम चालू होते, त्यावेळी सातत्याने अनिकेत पटवर्धन आणि सर्वगोड का जात होते. छत्रपतींच्या पुतळ्याची ६ फुटाची परवानगी असताना मग २८ फुटाची परवानगी कोणी दिली. कोणाच्या आदेशाने दिली ? कुठून पैसे घेतले. २ कोटी ४४ लाखाच्या पुतळ्याचे पैसे कसे दिले ? असे सवाल उपरकर यांनी उपस्थित केले.
उपरकर पुढे म्हणाले, अनिकेत पटवर्धनमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या नाराजी आहे. अनिकेत पटवर्धन हा भाजपचा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आहे.आता बांधकाम मंत्र्यांचा स्वीयसहाय्यक म्हणून काम करतो. चहा पेक्षा किटली गरम.. अशीच परिस्थिती सिंधुदुर्गात निर्माण झाली आहे. काही भाजपा कार्यकर्त्यांचे अनिकेत पटवर्धन यांच्याशी वाद देखील झालेले आहेत. आता बांधकाम विभागातील सर्व अधिकाऱ्यांना, मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांनी दबाव आणला जातो. अनेक कामांध्ये अनिकेत पटवर्धन आणि सर्वगोड पार्टनरशिपमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे सर्वगोड यांचे अनिकेत पटवर्धन यांना किती वेळा फोन गेले हे कॉल रेकॉर्डिंग वरुन समजेल. त्यामुळे या पुतळा दुर्घटनेसह विविध कामांच्या विषयांमध्ये या दोघांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.