मुंबई – जमलेल्या माझ्या तमाम… बांधवांनो शब्द कानांवर पडलेत की, एकच आवाज आणि तेज तर्रार खणखणीत शब्दांची धार असलेली वाणी म्हणजेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वाणी शब्द कानावर पडताच उभा राहतो तो धारणार, बाणेदार, रूबाबदार चेहरा, मराठी अस्मितेचे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा… पण आता बाळासाहेबांच्या आवाजाची तोफ जरी थंडावली असली तरी शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने शिवसेनेतील पोकळी आजही कायम आहे… त्यामुळे आता फक्त शिवाजी पार्क कुणाला एवढेच आता शिल्लक राहिले आहे… यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार? याची राजकीय वर्तुळासह शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने अर्ज केला आहे. मात्र, आता महापालिका कुणाला परवानगी देणार? हे पाहावं लागेल.
शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी मुंबई महापालिकेला अर्ज करण्यात आला आहे. या अर्जासोबतच मागील आठ महिन्यात तीन स्मरणपत्र देखील देण्यात आली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत अर्ज केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य सभा याच शिवाजी पार्क मैदानावर होत असत. पण २०२२ ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या सभेच्या जागेवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यंदा या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. यंदा या मैदानावर कुणाची सभा होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.