मुंबई – अश्विनी वैष्णव, रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री, यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मध्य रेल्वे येथे पाहणी केली. पाहणी सुरू करण्यापूर्वी वैष्णव यांनी मध्यवर्ती घुमटाखालील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनी सीएसएमटी हेरिटेज इमारत आणि भव्य जिना पाहिला. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नियोजित पुनर्विकासाचे लघु थ्रीडी मॉडेल पाहिले आणि उत्सुकतेने सर्वांगीण विकास आराखडा पाहिला आणि कामाच्या सद्य स्थितीचा आढावा घेतला. नियमित तपासणी करत वैष्णव यांनी उपनगरीय स्थानकाला भेट दिली आणि उपस्थित असलेल्या स्टेशन व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आरएलडीएच्या पुनर्विकासाच्या कामाची प्रगती आणि सीएसएमटी स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगची माहिती घेतली. नंतर वैष्णव यांनी अंबरनाथ लोकल ट्रेनच्या द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास केला.
यावेळी त्यांनी प्रवासी आणि पत्रकारांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना वैष्णव यांनी, मुंबई परक्षेत्रातील विविध प्रकल्प आणि त्यांची सद्यस्थिती यांची माहिती दिली. सध्या मुंबई महानगर क्षेत्रात 300 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आणि 16,240 कोटी रुपयांचे एकूण १२ प्रकल्प कार्यान्वित आहेत. यामध्ये मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कुर्ला 5वी आणि 6वी लाईन (17.5 किमी) प्रकल्पाचा पहिला टप्पा परळ – कुर्ला (10.1 किमी) डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कल्याण – आसनगाव चौथ्या लाईन साठी (32 किमी) भूसंपादन प्रगतीपथावर आहे ( पूर्णत्वाचे उद्दिष्ट : डिसेंबर 2026), कल्याण-कसारा तिसऱ्या लाईनचा (67 किमी) पहिला टप्पा आसनगाव – कसारा फेब्रु 2025 पर्यन्त व दूसरा टप्पा कल्याण-आसनगाव डिसेंबर 2025 पर्यन्त पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. निळजे-कोपर दुहेरी कॉर्ड लाईन (५ किमी) प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहे. यामध्ये मुंबई रेल विकास कार्पोरेशन (MRVC) च्या प्रकल्पांचा देखील समावेश आहे, पनवेल- कर्जत (29.6 किमी) उपनगरीय कॉरिडॉर ज्यांचे भराव काम, बोगदे आणि पुलाची कामे प्रगतीपथावर आहेत आणि डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे. ऐरोली-कळवा उन्नत उपनगरीय कॉरिडॉर लिंक प्रकल्पाचा दिघा गाव स्टेशन हा टप्पा कार्यान्वित झाला आहे.
कल्याण- बदलापूर 3री आणि 4थी लाईन (14.05 किमी) प्रकल्पाचे युटिलिटी शिफ्टिंग, माती भराव काम आणि पुलाचे काम प्रगतीपथावर आहे (टीडीसी: डिसेंबर 2025), विरार-डहाणू रोड 3री आणि 4थी लाईन (64 किमी) प्रकल्पाचे माती भराव काम आणि पुलाचे काम प्रगतीपथावर आहे आणि बोरिवली-विरार 5व्या आणि 6व्या लाईनच्या (26Km) प्रकल्पासाठी युटिलिटी शिफ्टिंग देखील चालू आहे (TDC: डिसेंबर 2027). पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल-बोरिवली 6वी लाईन (30 किमी) प्रकल्प ज्यातील खार-गोरेगाव टप्पा (8.9 किमी) कार्यान्वित झाला आहे आणि उर्वरित गोरेगाव-बोरिवली (8.2 किमी) मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच नायगाव-जुचंद्र दुहेरी कॉर्ड लाइनचे (6 किमी) प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. वैष्णव यांनी भांडुप स्थानकापर्यंत धीम्या लोकलने प्रवास केला आणि पुढील नियोजित कार्यक्रमासाठी तेथे उतरले. त्यांनी सांगितले की सर्व कर्मचारी माझे कुटुंबीय आहेत असे सांगितले व कर्मचाऱ्यांच्या विनंतीचा मांन ठेवत त्यांच्यासोबत सेल्फी घेतली.