विजय वैद्य गेले.. समाज सेवेचे एक पर्व संपले..!

0

योगेश वसंत त्रिवेदी, (9892935321.)

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

yogeshtrivedi55@gmail.com

————————————-

ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू राजकीय विश्लेषक, समाजसेवेचा मानबिंदू, अनेक संस्था संघटनांच्या प्रसववेदनांच्या कळा सहन करुन त्या तब्बल बेचाळीस वर्षे अहोरात्र चालविणारे विजय दत्तात्रय वैद्य यांनी ऐन गणेशोत्सवात आपली इहलोकीची यात्रा संपवून परलोकी प्रस्थान ठेवले. बरोबर पंचवीस दिवसांपूर्वी विजय शंकर केळुसकर यांनी इहलोकीची यात्रा संपविली. तो धक्का सहन होत नाही तोपर्यंत दुसरा जबरदस्त धक्का देणारे समाजसेवेचे एक पर्व विजय वैद्य यांच्या देहावसानाने संपले. १९२१ च्या १६ ऑक्टोबर रोजी केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन नांवाचे नियतकालिक सुरु केले आणि १६ ऑक्टोबर २०२१ रोजी या ‘प्रबोधन’ची शताब्दी संपन्न झाली. प्रबोधन हे केशवराव ठाकरे यांनी सुरु केले असल्याने ओघानेच त्यांच्या नावापुढे प्रबोधनकार ही उपाधी लागली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या आयुष्यातील चढ उतार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचा सहभाग, अंधश्रद्धा विरोधात केलेले कार्य, विविध प्रकारच्या भूमिका मग सामाजिक, राजकीय क्षेत्रातील असो की प्रत्यक्ष चित्रपटात काम करणे कुठेही ते कमी पडले नाहीत. परखड पणे मते मांडतांना कुणाचाही मुलाहिजा त्यांनी बाळगला नाही. शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पासून अनेक दिग्गज मंडळी त्यांच्या संपर्कात होती. हा सारा इतिहास आपल्याला त्यांच्या ‘माझी जीवनगाथा’ यातून मिळतो. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत आणि विजय वैद्य ही जोडगोळी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या परीसस्पर्शाने पावन झालेली आहे. विजय वैद्य हे तसे जव्हारचे. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथून विजय वैद्य मुंबईला आले. चेंबूरला वास्तव्यास असतांना ते टाइम्स ऑफ इंडियाच्या जॉब डिपार्टमेंट मध्ये नोकरी करीत होते. जेमतेम ४६८ रुपये पगार होता. लग्न झालेले नव्हते. एकटा जीव सदाशिव. हरहुन्नरी आणि चळवळ्या स्वभाव. चेंबूरला असतांना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानात विजय वैद्य यांनी एक बातमी शोधून काढली. तडक गिरगाव गाठले. नवाकाळ मध्ये निळूभाऊ खाडिलकर यांना भेटून बातमी दिली. भाऊंनी ती पहिल्या पानावर ठळकपणे छापली. ‘बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांची संघटना स्थापन करणार !’ अशा आशयाची ती बातमी होती. योगायोगाने बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले तुम्हाला ही बातमी कशी समजली ? अहो साहेब, तुम्हीच भाषणात बोललात मराठी माणसाची संघटना स्थापन करणार म्हणून. तो १९६६ चा मे महिना होता आणि बरोब्बर १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी ‘शिवसेना’ अस्तित्वात आली. या निमित्ताने विजय वैद्य यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी ये जा वाढली. तिथेच दादा म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या समवेत संवाद साधण्याची संधी विजय वैद्य यांना मिळाली. एकदा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विजय वैद्य यांनी दादांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. दादा भडकले. त्यांच्या शैलीत म्हणाले, “काय रे ? एवढा मोठा झालास ? फोनवरून मला आशीर्वाद देतोस ? वैद्यांची पाचावर धारण बसली. दादा, आलोच असे म्हणत त्यांनी दादांचे घर गाठले. तिथे दादा आणि वैद्य यांचे संभाषण झाले. दादा म्हणाले माझ्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. तू येतोस नां ? दादा, दांडी मारावी लागेल. तिथे प्रा. अनंतराव काणेकर बसले होते. त्यांनी काय विजयराव ? असे म्हणताच दादा म्हणाले, काणेकर, तुम्ही यांना ओळखता ? होय दादा, फार चांगले काम करताहेत हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे. काणेकर म्हणताच दादा म्हणाले, होय, चांगला आहे पण आगाऊ आहे. दादांनी ठेवणीतली कोपरखळी मारली. वैद्य यांनी शरणागती पत्करली आणि होय, दादा येतो कार्यक्रमाला. आणि मग प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या आत्मचरित्राचा प्रकाशन समारंभ झाला. त्याचा हंशा, टाळ्यांसह वृत्तांत विजय वैद्य यांनी दिला. तो दादांना आणि बाळासाहेब ठाकरे यांना अतीशय आवडला. प्रबोधन शताब्दी निमित्ताने याचा बऱ्याच वेळा उल्लेख झाला. हाच वृत्तांत डॉ. मनोहर जोशी यांच्या ‘शिवसेना : काल, आज आणि उद्या’ या पुस्तकात संपूर्ण प्रसिद्ध करण्यात आला आहे. २००० साली बोरीवली येथे प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिराचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विजय वैद्य यांनी लिहिलेल्या ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या छोटेखानी पुस्तिकेचे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. पण बाळासाहेबांच्या वाट्याला जेमतेम एक पुस्तक आले म्हणून त्यांनी रवि म्हात्रे यांच्या मार्फत विजय वैद्य आणि विनोद घोसाळकर यांना निरोप दिला की, उद्या सकाळी जेवढी पुस्तके असतील तेवढी घेऊन या. दोघे हादरले. काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक ? इकडून तिकडून पंचवीस पुस्तके जमा करुन वैद्य आणि घोसाळकर मातोश्रीवर पोहोचले. काय रे किती पुस्तके आणलीत ? करड्या कठोर स्वरात बाळासाहेबांनी विचारणा केली. साहेब, पंचवीस आणलीत, चोवीस तुमच्या साठी आणि एक सही करुन मला. एवढी पुस्तके काय करु ? सही ? आणि माझी ? अरे, तू दादांची सही जपून ठेवली नाहीस तिथे माझी काय जपून ठेवणार ? साहेब ? तुम्ही पुस्तक वाचलंत ? अरे, वाचलंच नाही तर पारायणं केलीत. मला प्रचंड आवडलं. बरं, ते जाऊ दे. मला याची तीन हजार पुस्तके छापून पाहिजेत. यात तुला काय आणखी घालायचे ते घाल. काय वाट्टेल ते कर. वैद्य आणि घोसाळकर लागले कामाला. २००१ साली ‘आठवणीतले प्रबोधनकार’ च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्षे लोटली. अचानक चिपळूण चे धडाकेबाज आमदार आणि शिवसेना नेते भास्करराव जाधव यांनी विजय वैद्य यांना फोन केला. आप्पा, मला तुम्हाला भेटायचंय. झाले वैद्य आणि भास्करराव यांची भेट झाली. भास्करराव म्हणाले, आप्पा, मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतांना मला कुणीतरी’आठवणीतले प्रबोधनकार’ हे पुस्तक आणून दिले. मी ते संपूर्ण वाचून काढले. महाराष्ट्रात प्रत्येक शिवसैनिकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे, असं मला वाटतं. आणि चक्रं फिरली. उदय पै या कलामहर्षिंना गाठलं. सगळी जुळवाजुळव झाली. जगद्विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी काढलेले प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण जीवन दर्शविणारे चित्र प्रबोधन प्रकाशन यांच्या सौजन्याने उदय पै यांनी उपलब्ध करुन दिले. सुदेश म्हात्रे यांनी आवर्जून आठवण करुन दिली. सर्वच संबंधित व्यक्ती पुढे सरसावल्या आणि गुरुवार, ९ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या भव्य सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेच्या प्रारंभापासून असलेले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री म्हणून कार्यरत असलेले सुभाष देसाई यांच्या हस्ते पंढरीनाथ सावंत, भास्करराव जाधव, विक्रांत भास्करराव जाधव, नरेंद्र वाबळे, मंदार पारकर, महेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत आठवणीतले प्रबोधनकार या विजय वैद्य यांच्या पुस्तकाच्या चित्ताकर्षक, विचारप्रवर्तक अशा तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन भारलेल्या आणि भारावलेल्या वातावरणात संपन्न झाले. या निमित्ताने विजय वैद्य यांच्या लेखणीतून प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ आणि ‘ऊठ मऱ्हाठ्या ऊठ’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाचा ऐतिहासिक वृत्तांत याठिकाणी सादर करीत आहे. ★ माझी जीवनगाथाः
पुस्तक प्रकाशन- प्रकाशक मा.महापौर,
निवेदक-शिवसेनाप्रमुख

प्रबोधनकार ठाकरे यांचे अत्यंत गाजलेले पुस्तक म्हणजे ‘माझी जीवनगाथा’. या पुस्तकाचे आणि ‘ऊठ मऱ्हाठ्या ऊठ’ या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे, अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन महापौर सुधीर जोशी यांच्या हस्ते थाटामाटात झाले. पत्रकार विजय वैद्य यांनी या प्रकाशन समारंभाचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे, ते असे –
प्रबोधनकारांचा भव्य सत्कार : दोन पुस्तकांचा आलिशान प्रकाशन समारंभ
17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. दादरच्या सूर्यवंशी सभागृहात समारंभ आयोजित करण्यात आला होता परंतु पाच वाचल्यापासून आबालवृद्ध सभागृहाकडे जमले होते. समारंभाची वेळ होण्यापूर्वीच सूर्यवंशी सभागृह भरगच्च झाले होते. प्रवेशद्वारावरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमदार प्रमोद नवलकर व नारायण आठवले उपस्थितांचे स्वागत करीत होते.
महापौरांना येण्यास विलंब झाला तरीदेखील कमालीची शांतता होती. पू.दादासाहेब ठाकरे सभागृहात येताच त्यांचे टाळ्यांचा गजरात व सनईवादनाने प्रचंड स्वागत झाले. बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या परवानगीने कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली. प्रा.धों वि.देशपांडे,श्री.श्री.शं. नवरे, प्रा. अनंत काणेकर, डॉ. हेमचंद्र गुप्ते, सोमैया शेठ व्यासपीठावर स्थानापन्न झाले. काही वेळाने आमदार नवलकर, जोशी व चरित्रकार धनंजय कीरही स्टेजवर आले.
विद्वान हजर ! राजकारणी नाहीत !
शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बाळासाहेब ठाकरे यांनी समारंभास प्रारंभ केला. उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘आज व्यासपीठावर सारे विद्वान बसलेले आहेत, ते राजकारणी नाहीत (हंशा). राजकारणी लोक विद्वान असतातच असं म्हणण्याचं धाडस सध्याच्या लोकशाहीच्या जमान्यात तरी कोणी करणार नाही (हंशा). असो, आजच्या कार्यक्रमासाठी अनेक संदेश आले आहेत. सर्व मंत्र्यांना आजच्या समारंभाची आमंत्रणे पाठवली होती. फक्त ना. वसंतदादा पाटील यांचा संदेश आला आहे. महाराष्ट्राच्या विविध शाखांतून संदेश आले आहेत. आज असंख्य व्यक्तींनी हार आणले आहेत. प्रबोधनकारांनी आयुष्यभर अनेक भार सहन केले पण आज हारांचं ओझं पेलणं शारीरिकदृष्ट्या कठीण दिसतं. तेव्हा प्रबोधनकारांनी ज्या शिवप्रभूंना आयुष्यभर आपलं दैवत मानलं त्या शिवप्रतिमेस सर्वांनी हार अर्पण करावेत.’ थोड्या वेळात हारांचा प्रचंड ढीग झाला. हारांचा कार्यक्रम सुरु असतानाच महापौर सुधीर जोशी सभास्थानी आले.
…आणि पुस्तकाचे प्रकाशन झाले
यानंतर सौ. राजे यांनी प्रबोधनकारांवर रचलेले गौरवगीत म्हटले. ‘मार्मिक’कारांनी पुस्तक प्रकाशनाची विनंती केल्यावर टाळ्यांच्या प्रदीर्घ कडकडाटात महापौरांनी ‘ऊठ मऱ्हाठ्या ऊठ’ व ‘माझी जीवनगाथा’ पुस्तकांचे प्रकाशन केले. पुस्तकांविषयी माहिती देताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकांच्या दोन वेगवेगळ्या, एक लायब्ररी एडिशन व दुसरी पॅाप्युलर एडिशन आहे. हे पुस्तक सोमैया पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले तर ‘ऊठ मऱ्हाठ्या ऊठ’ आमच्या नारायण आठवल्यांनी आराधना प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केले आहे. ‘ऊठ मऱ्हाठ्या ऊठ’ हे शिवसेनेचे बायबल आहे असे प्रबोधनकारांनी सांगितले (टाळ्या). माझी खात्री आहे की, जो जो हे पुस्तक वाचेल तो तो शिवसैनिक झाल्याशिवाय राहणार नाही (टाळ्या). ही दोन्ही पुस्तके म्हणजे लेणे आहे (टाळ्या). आता मी प्रथम प्रा. अनंत काणेकरांना तोफ डागायला सांगतो (हंशा).
प्रबोधनकारांनी मराठी भाषेचा इंगा दाखविला
प्रबोधनकारांना ‘महर्षी’ असे संबोधून प्रा.अनंत काणेकर म्हणाले, ‘वयाच्या आठव्या वर्षापासूनच मी दादांची पुस्तकं वाचतो आहे. प्रबोधन हा शब्दही त्यांचाच! प्रबोधनकारांच्या लिखाणाची खास वैशिष्ट्यं आहेत. ते मराठ्या हा शब्द ‘-ह’, र ला ह असाच लिहितील. प्रबोधनकारांचं लिखाण वाचकालाही उत्साहित करतं. हे काम येरागबाळ्याचं नव्हे (टाळ्या). त्यांनी आपल्या भाषेचा इंगा अनेकांना दाखवला (हंशा). मराठी भाषा काय आहे ? आणि प्रबोधन लेखणीने कसं करता येतं हे त्यांनी दाखविलं (टाळ्या).
महाराष्ट्रप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच भाग
प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राचे एक महान शिल्पकार आहेत असे सांगून प्रा. काणेकर म्हणाले, ‘प्रबोधनकारांचं मराठीपे्रम आणि शिवाजीप्रेम अगदी निस्सीम आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी फार बहुमोल कामगिरी केली पण ते संकुचित वृत्तीचे नव्हते आणि नाहीत. राष्ट्रप्रेमाचा एक भाग म्हणूनच त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे (टाळ्या). राष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा महाराष्ट्रच आघाडीवर प्राणपणाने लढतो हे आजवरच्या अनेक लढायांत सिद्ध झालं आहे (टाळ्या). प्रबोधनकारांच्या सामाजिक सुधारणेच्या चळवळीबद्दल बोलताना प्रा. अनंत काणेकर म्हणाले, ‘सामाजिक सुधारणांची ज्योत प्रबोधनकारांनी प्रज्वलित केली. हुंड्याविरुद्ध त्यांनी बंड पुकारलं आणि समाजाला धक्का दिला (हंशा). दादा वयोवृद्ध झालेत पण त्यांची वाणी व लेखणी यातील जोश मात्र कायम आहे. आज सकाळी मी त्यंाना म्हटले, दादा तुम्हाला वाचता येतंय ही चांगली गोष्ट आहे.’ त्यावर लागलीच ते म्हणाले, ‘अरे बाबा, मी वाचतोय म्हणूनच अजून वाचलोय (हंशा व टाळ्या). असे हे मराठी माणसाचे, मऱ्हाठी भाषेेचे, शिवाजीचे, महाराष्ट्राचे प्रेमी दादा! जोपर्यंत महाराष्ट्र व मराठी भाषा आहे तोपर्यंत प्रबोधनकारांचे नाव अजरामर राहील (टाळ्या). या थोर महापुरुषास मी मराठी साहित्यिकांच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो.’

राष्ट्राचे काय होणार ? ही दादांना चिंता
आपली गणना विद्वानात केली याचा प्रारंभीच निषेध करुन पत्रपंडित श्री.काकासाहेब नवरे म्हणाले, ‘प्रबोधनकारांचे महाराष्ट्रावर फार फार उपकार आहेत. ते आमच्या पत्रकारांतील खरे भीष्माचार्य आहेत (टाळ्या). शिवाजी पार्कवरील शिवाजीच्या पुतळ्यांचे जनक हे ! ही वस्तुस्थिती फारच थोड्यांना माहीत असेल. त्यांनी मला माझ्या लहानपणी शिवाजीचं एक चित्र भेट दिलं होतं ! प्रबोधनकार वृद्ध झाले तरी त्यांची स्मृती नि डोकं शाबूत आहे (हशा). काहींची डोकी तरुणपणीच बिघडतात (हंशा). सचिवालयात असे कितीतरी आहेत (प्रचंड हशा). आज फक्त एकाच मंत्र्यांचा संदेश आला आहे, यावरुनच काय ते ओळखावं (हंशा).’
प्रबोधनकारांएवढ्या हालअपेष्टा कोणी काढल्या नसतील!
महाराष्ट्रभूषण प्रबोधनकारांचे जीवन मातृभक्ती, महाराष्ट्र धर्मभक्ती व शिवभक्ती यांमुळे पुनीत झाले आहे असे सांगून सुप्रसिद्ध चरित्रलेखक श्री. धनंजय कीर म्हणाले, ‘प्रबोधनकार आताच शतायुषी झाले आहेत. अनेक महान व्यक्ती शतायुषी झाल्या पण प्रबोधनकारांएवढ्या हालअपेष्टा कोणीच काढल्या नसतील.
एखाद्या पदवीधरास लाजवील असं त्यांचं इंग्रजीचं ज्ञान आहे. प्रबोधनकार म्हणजे स्वाध्याय विद्यापीठ आहे (टाळ्या). दादांचा महाराष्ट्राभिमान अत्यंत जाज्वल्य आहे. स्वार्थ टाळून ते कृतार्थ जीवन जगले आहेत. प्रा. यदुनाथ सरकार व प्रा.दत्त यांनाही प्रबोधनकार वंदनीय वाटतात (टाळ्या).
लोकमान्य टिळकानंतर इतका ओजस्वीपणे लिहिणारा लेखक प्रबोधनकारांशिवाय दुसरा झालाच नाही (टाळ्या). ज्यांना मराठी भाषा शिकायची असेल त्यांनी प्रबोधनकार आणि आचार्य अत्रे यांचं साहित्य वाचले पाहिजे (टाळ्या). त्यांचं लिखाण वाचा आणि पाहा म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे काय ते कळेल. प्रबोधनकारांनी मानवतावादी दृष्टिकोनातून लिखाण केले. सामान्य माणसाच्या अधिकारासाठी झगडावं हेच जीवनगाथेचं महत्व आहे (टाळ्या). प्रबोधनकारांच्या पुस्तकास प्रस्तावना लिहिण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. प्रबोधनकारांना वंदन करणं म्हणजे महाराष्ट्र जनतेस वंदन करण्यासारखं आहे.
सदा पिकत असलेला आंबा-प्रबोधनकार !
45 वर्षांचा होईपर्यंत प्रबोधनकारांशी संबंध आला नव्हता, असे सांगून प्रा.धों.वि.देशपांडे म्हणाले, ‘मला तर ते अगदी पक्क्या आंब्यासारखे – की जो आंबा पिकतो-गोड होतो, कधी नासत नाही. नेहमी पिकतच राहतो असे भासतात (हशा व टाळ्या) दादा शरीराने थकले असले तरी मन मात्र अजून तरुण आहे नि या वयातही दादांची बुद्धी रोज नवनवे प्रांत शोधीत असते. वयाच्या 89 व्या वर्षी बुद्धी अशी शाबूत ठेवणं हे तपश्‍चर्येचं काम आहे.
महाराजांपासून महारांपर्यंत कार्य केलेल्या महाराष्ट्रातील दोनच व्यक्ती, आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे, असे सांगून प्रा. देशपांडे म्हणाले, ‘दादा आता मुनीपदाला पोहोचले आहेत. आपल्या हयातीत आपला मुलगा आपल्यापेक्षा अधिक कीर्तिमान झालेला पाहण्याचं परमभाग्य दादांना लाभलं (टाळ्यांचा प्रचंड कडकडाट). इतिहासात पिता-पुत्रांच्या अशा जोड्या फारच थोड्या आढळतील. मोतीलाल – जवाहरलाल, आशुतोष-श्यामाप्रसाद, दादासाहेब – बाळासाहेब ही तुरळक उदाहरणं आहेत. अन्यथा ‘नामवंताचं कार्टं करंट’ असंच नेहमी घडतं (हंशा).
आंबा कोणत्या अढीत नव्हता ?
प्रा.देशपांडे यांच्यानंतर ‘मार्मिक’कारांनी आपल्या मिस्कील शैलीत सांगितले की, हा आंबा नासला नाही, डागाळला नाही, नेहमी पिकतच राहिला, असे प्रा.देशपांडे म्हणाले. त्याचे कारण हा आंबा कधीच कोणत्या अढीत नव्हता ? तो स्वतंत्रपणे जगला! (टाळ्या) शिष्यही तसाच निघेल अशी आशा करु या ! (हंशा).
प्रबोधनकार ब्राह्मणद्वेष्टे नव्हते व नाहीत !
महापौर सुधीर जोशी यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात प्रबोधनकारांचा गौरव केला. ते म्हणाले, ‘दादा म्हणजे Encyclopediaआहेत. बाळासाहेबांना कोणतीही माहिती हवी असेल तर ते प्रबोधनकारांकडे जातात आणि प्रबोधनकार कोणतीही माहिती अगदी क्षणार्धात देतात. तरुण महापौर म्हणून माझा उल्लेख होतो पण 89 च्या वर्षीदेखील दादांचा उत्साह आणि कार्यशक्ती पाहून मला स्वतःला तरुण म्हणवून घ्यायची लाज वाटते (हंशा). दादा 89 वर्षाचे झाले तरीही ते विद्यार्थीच आहेत.
प्रबोधनकार ब्राह्मणद्वेष्टे आहेत असं म्हटलं जातं. पण मला वाटतं ज्या ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली दांभिकपणे समाजाला छळण्याचा चंग बांधला त्याविरुद्ध दादा होते. दांभिकपणे वागणा-या ब्राह्मणांविरुद्ध दादांनी कोरडे ओढले (टाळ्या). शारीरिक दुर्बलता दादांच्या ज्ञानार्जनाच्या आड कधीच आली नाही. दृष्टीदोष झाला तरी दादांनी वाचन कायम ठेवलं. हाताची बोटं काम देईनाशी झाली तेव्हा हातमोजे घालून त्यांनी टायपिंग केलं. जीवनातील सर्व भूमिका ते यशस्वीपणे जगले (टाळ्या). तैलचित्रकार, छायाचित्रकार, सतारवादक, लेखक, पत्रकार, इतिहासकार इत्यादी सर्व क्षेत्रं दादांनी पालथी घातली. सर्व राजकीय पक्षांबरोबर त्यांनी कामं केली पण पक्षीय राजकारणाच्या बजबजपुरीपासून ते नेहमी अलिप्तच राहिले; म्हणूनच जे अयोग्य वाटले त्याबद्दल दादांनी निर्भीडपणे कोरडे ओढले. (टाळ्या).
तोही चान्स मला द्या! महापौरांची मागणी
दादांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा बहुमान मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो असं सांगून महापौर म्हणाले, ‘दादांनी आता पुढील वर्षात पुस्तकं लिहून त्यांच्या वयाच्या शताब्दीला पुस्तक प्रकाशन करण्याची संधी मला द्यावी अशी माझी इच्छा आहे. प्रबोधनकारांचा 100 वा वाढदिवस माझ्याच अध्यक्षतेखाली साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन दादा शतायुषी होत अशी सदिच्छा व्यक्त करतो.’
माझ्यावर जबाबदारी – शिवसेनाप्रमुख
दादांचा 100 वा वाढदिवस आपल्याच अध्यक्षतेखाली व्हावा या इच्छेबद्दल शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘सुधीरभाऊंनी पुढील 12 वर्षाचे Advance Booking करुन ठेवल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे (हंशा) पण जगदंबेच्या कृपेने, तिच्या आशीर्वादाने सारं काही मनासारखं होईल.’ (टाळ्या).
सोमैया पब्लिकेशन्सचे शांतिपीठ सोमैया यांनी प्रबोधनकार 125 वर्षे जगावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘माझी जीवनगाथा’ प्रसिद्ध करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा अभिमान वाटतो.
संघर्षमयी प्रबोधनकार
वयाच्या 89 च्या वर्षीही त्यांनी तब्बल 40 मिनिटे भाषण केले. आवाजाची धार कायम आहे, याची जाणीव सर्वांना झाली. भाषणांच्या बाबतीत मैदाने गाजविणारा ठाकरे आता नाही असे सांगून प्रबोधनकार म्हणाले, ‘चार पिढ्यांच्या संघर्षातून, सहवासातून तयार झालेला मी माणूस आहे. पूर्वीचा समाज आणि सध्याचा समाज यांत फार फरक आहे. विशेषतः महिलांनी सुधारणेची फार मोठी उडी मारली आहे (हंशा). धर्माच्या आणि रुढीच्या नावाखाली त्यांच्यावर फार अत्याचार होत होते त्याचा महिलांनी चांगलाच सूड उगविला आहे (हंशा व टाळ्या). मी म्हणतो, महिलांनो, आणखी सुधारणा करा.’
‘अस्पृश्यता, दांभिकपणा व खोटं बोलणं याचा मला तिरस्कार आहे’ असे सांगून प्रबोधनकार म्हणाले, ‘ मी 14 वर्षाचा असतानाची गोष्ट. पनवेलला गंगाराम सुभेदार नावाचे मिलिटरीतले सुभेदार राहत होते. त्यांना अस्पृश्य म्हणून अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. मी एक दिवस त्यांच्याकडे चहा घेतला. लोक म्हणाले, ठाक-यांचं कार्टं बिघडलं (हंशा). त्या सुभेदाराची विधवा सून होती. अंगावर दागिने होते पण कपाळावर कुंकू नव्हतं. तिचा नवरा रणागणंावर मृत्युमुखी पडला होता. मी तिला विचारलं, ‘बाई, तू कुंकू का लावीत नाहीस?’ विधवांनी कुंकू लावू नये असं कोणत्याच धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही. त्यावर त्या बाईने मार्मिक उत्तर दिलं. ती म्हणाली,‘ माझा नवरा बिछान्यावर लोळागोळा होऊन मेला नाही. रणांगणावर तलवार गाजवीत असताना धारातीर्थी पडला आहे.’ त्या बाईच्या उद्गारांचा माझ्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्या उद्गारांपासून मी खूप काही शिकलो. ‘खरा ब्राह्मण’ नाटक लिहिले तेव्हा विठू महाराची सून हे पात्र रंगवताना मी त्याच बाईचे चित्र रंगविले होते.
माझी बय !
आपल्या आजीची, बयची आठवण सांगताना प्रबोधनकार म्हणाले, अडलेल्या महिलांची प्रसूती करण्यासाठी ती नेहमी जाई. पनवेलच्या परिसरात हजारो बाळंतपणं तिने केली. एक दिवस बाहेर गेली होती. डॅाक्टर म्हणाले, बय आज तुझा चान्स हुकला (हंशा). बयने त्या बाईची भेट घेतली, तपासलं आणि बाहेर डॅाक्टरांना सांगितले, डॅाक्टर थोडा वेळ थांबा आणि काय आश्‍चर्य त्याच बाईची पंधरा मिनिटानंतर दुसरी डिलिव्हरी (हंशा).
बय मेली त्यावेळी सगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक आले. त्यांनी खांदा देण्याची इच्छा दर्शविली. आपल्या आईची आठवण सांगताना प्रबोधनकार म्हणाले, एकदा मला 100 पैकी 90 मार्क मिळाले. मी घरी आलो. खुशीत होतो पण मातोश्रींनी फाडकन मुस्कटात लगावली. 10 गुण का कमी मिळाले असा तिचा सवाल होता (हंशा). नीट-नेटकेपणावर तिचा भर होता. मुलाचे लाड खाण्यापिण्याच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत नव्हे असा तिचा कडक नियम होता. आमच्या मातोश्री म्हणजे फार कडक काम होतं (हंशा). कडकलक्ष्मीच ती (हंशा).
स्वतंत्रपणे धंदा करा – तरुणांना उपदेश
तरुण पिढी हुन्नरी असेल तर कधीही बेकार राहणार नाही, असे सांगून प्रबोधनकार म्हणाले, ‘पडेल ते काम करण्याची, कष्ट करण्याची तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे. केवळ टेबल खुर्चीवर बसून कारकुनी करण्यात धन्यता मानता कामा नये. स्वतंत्रपणे उद्योग करा (टाळ्या). मी सर्व धंदे केले. फोटोग्राफी केली. घरात कधीही पाहिलं नाही. पत्नीवर सारं सोपवलं. तिला मी संागे, तुला खंडणी एक तारखेस मिळाली म्हणजे झालं. तिने सारं घरातलं पाहिलं. म्हणूनच मी मनन, वाचन करुन ढोंगीपणाविरुद्ध लढू शकलो (टाळ्या).
विरोधकांचेही उपकार
प्रबोधनकार म्हणाले, ‘माझं आयुष्य घडवण्यात अनेकांचं साहाय्य झालं. माझे टीकाकार, त्यांचेही उपकार मला विसरता येणार नाहीत. ज्यांनी माझा प्रतिकार केला, मला विरोध केला त्यांचेही माझ्यावर फार उपकार आहेत. त्यांनी जर असं केलं असतं तर माझ्या लेखणीला आणि वाणीला धारच चढली नसती (टाळ्या). माझी दृष्टी कायम ठेवण्यासाठी डॉ.ओकांनी माझ्यावर आणि माझ्या घराण्यावर फार मोठे उपकार केलेत. माझा बाळ, शिवसेना त्याने काढली. हिंदुत्व टिकवण्यासाठी धडपडतो आहे (टाळ्या). माझ्यापेक्षा त्याने शतपट पराक्रम गाजवला याचा मला किती अभिमान वाटतो (प्रचंड टाळ्या). माझ्या दोन्ही सुना, विशेषतः बाळाची बायको, तिला मी सरु म्हणतो, काय मागेन ते पाच मिनिटांत हजर करते. डॉ. जयंत देशमुखांचाही मी ऋणी आहे.
‘दांभिकपणा आणि खोटं बोलणं याची मला फार चीड आहे म्हणूनच याविरुद्ध मी लेखणी उचलून समोर येईल त्याला उभा चिरला आहे. कसलीही पर्वा केली नाही. शाहू महाराजांनी सहा मराठा तरुणांना अंबाबाईची पूजा केल्याबद्दल अटकेत टाकलं तेव्हा ‘अंबाबाईचा नायटा’ म्हणून लेख लिहिला. प्रबोधनकार शेवटी म्हणाले, ‘माझ्यावर झालेले उपकार कसे फिटतील, याची मला चिंता आहे. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो, अशी मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो.’ यानंतर राष्ट्रगीत झाले व कार्यक्रम संपला. सर्व समारंभ जवळजवळ अडीच तास चालला, तरीही कंटाळवाणा झाला नाही. शेवटी बाळासाहेबांनी आभार मानले. कार्यक्रमातील गोड आठवणी घेऊनच, कोकाकोला घेतल्यानंतर सर्व श्रोतृवर्ग आनंदी चेह-याने सभागृहाबाहेर पडला. सबंध कार्यक्रम अगदी म-हाठमोळ्या पद्धतीने पार पडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन केले. हे जसे वैशिष्ट्य तसेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय प्रसंग म्हणजे ते पुस्तक प्रकाशन असे केले जाते आणि तीच गोष्ट सुधीर जोशी सांगतात.‘या दोन पुस्तकांचं प्रकाशन करण्याची संधी मिळाली हे माझं परम सौभाग्य.’★ आज शनिवार १४ सप्टेंबर २०२४ चा दिवस उजाडला तोच दुःखद बातमीने. शुक्रवारी संपूर्ण दिवस उपनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या आमंत्रणांचे वाटप करुन रात्री ९ वाजेपर्यंत उपनगरचा राजा च्या मांडवात बसून पुढच्या कार्यक्रमांची आखणी केली आणि रात्री वैभव या मोठ्या मुलाकडे गेले. सकाळी सहाच्या सुमारास प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांकडे जायला निघाले. पण तिथेच ते कोसळले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धावाधाव झाली. फोनाफोनी झाली. तासाभरात त्यांनी लहानाचे मोठे केलेले कार्यकर्ते धावत आले. पत्रकार, नेतेमंडळी, रिक्षाचालक, घरेलू कामगार आदी सर्वच क्षेत्रातील लोकांची रीघ लागली. विजय वैद्य यांच्या शेवटच्या इच्छेनुसार शुक्रवार ची सर्व वर्तमानपत्रे आणून पार्थिवाजवळ ठेवली. स्वर्गरथातून महायात्रा सुरु झाली. जय महाराष्ट्र नगर येथील निवासस्थानी हा स्वर्गरथ आणण्यात आला आणि तेथे सर्वांनी हंबरडा फोडला. पण रडायचं नाही, लढायचं, दुःखात नव्हे आनंदात मला निरोप द्या, असे त्यांनी सांगितले असल्याने बॅंड पथकाने भक्तीगीते वाजवून त्यांना मानवंदना दिली. जय महाराष्ट्र नगरातील तब्बल बेचाळीस वर्षांचं पर्व अखेर १४ सप्टेंबर रोजी संपलं. हे ईश्वरा त्यांच्या आत्म्याला शांती दे एवढीच प्रार्थना !

—–+_–_——

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech