कलेची किंमत पैशांपेक्षा कित्येक पटीने अधिक – सुबोध भावे

0

सोलापूर – कला पैशात मोजता येत नाही. बिदगीच्या पलीकडे कला आहे. कलेची किंमत पैशांपेक्षा किती पटीने अधिक आहे, असे प्रतिपादन सिने कलावंत सुबोध भावे यांनी केले. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या बौद्धिक व्याख्यानमालेचे उद्घाटन हुतात्मा स्मृती मंदिरात पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते झाले. प्रारंभी दीप प्रज्वलन आणि श्री गणेश पूजन करुन व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. व्याख्यानमालेचे यंदाचे ४८ वे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे होते. याप्रसंगी व्यासपीठावर मुलाखतकार मंजुषा गाडगीळ, बँकेचे संचालक माजी अध्यक्ष वरदराज बंग, तज्ञ संचालक ॲड. प्रदीपसिंग राजपूत, संचालिका चंद्रिका चौहान, संचालक पुरूषोत्तम उडता, जगदिश भुतडा, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार, उपाध्यक्षा प्रीती चव्हाण उपस्थित होते. पोलीस आयुक्त एम. राज कुमार म्हणाले, जनता बँकेसारख्या व्याख्यानमालेतून समाज प्रबोधन घडते. कर्णकर्कश डॉल्बी, लेझर शोपेक्षा व्याख्यानमालांतून समाजाला चांगली शिकवण देण्याची अधिक गरज आहे. चांगले विचार असल्यामुळेच जीवनात बदल घडतो. बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले, सोलापूर जनता सहकारी बँकेने अर्थकारणासोबतच आजवर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले आहे. समाजातील विविध घटकांना उत्तम सेवा देण्याचे कार्य सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मुलाखती दरम्यान सिने कलावंत सुबोध भावे म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी भाग्य लागते. ते भाग्य मला मिळाले. त्यांच्या विचारांना, त्यांच्या चरणांना स्पर्श करता आला ही माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची घटना आहे. बालगंधर्व आणि जुन्या पिढीतील अनेक दिग्गजांनी सर्वस्वाचा त्याग करून कला मोठी केली. त्याची फळे आताच्या पिढीला मिळत आहेत. यावेळी सुबोध भावे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’, ‘काशिनाथ घाणेकर’ अशा अनेक भूमिकांचे अनुभव सांगितले. माझ्या अभिनयाच्या प्रवासातील पहिलं मोठं नाटक सोलापूरच्या शिरीष देखणे यांनी लिहिले होते. त्या नाटकाला तृतीय बक्षीस मिळाले असा अनुभव अभिनेते सुबोध भावे यांनी सांगताच प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांचा गजर करीत त्यांचा गौरव केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech