आमदार शिरसाट यांना बाप्पा पावला….सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती….!

0

मुंबई -अनंत नलावडे

राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका अवघ्या महिन्यांवर होवू घातलेल्या असतानाच,सोमवारी रात्री महायुती सरकारने काही महामंडळावरील नियुक्त्या तातडीने जाहीर केल्या. या नियुक्त्या मध्ये फक्तं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच पावल्याचे दिसून येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, व देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या वाट्याला काहीच लागले नसल्याचे यादी वरून नजर मारताना दिसून आले. आज जाहीर झालेल्या यादीत सिडकोच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची नव्याने निवड नियुक्ती केली असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.नगरविकास विभागानेच या संदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी केला.आगामी विधानसभा निवडणुकीत नाराज आमदारांचा फटका बसू नये,यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही नवी खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.शिरसाट यांच्या नाराजीवर पडदा टाकण्यात मुख्यमंत्री शिंदे यशस्वी झाल्याचे बोलले जात असले तरी आणखी एक नाराज आमदार शिवसेनेचे मुख्य प्रतोद व मुख्यमंत्र्यांचे खंदे समर्थक असलेल्या महाड चे आमदार भरत गोगावले यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा ठोकला. शिंदे सोबत ४० आमदारांनी ठाकरेंना रामराम केला.आमदार संजय शिरसाट व महाडचे आमदार भरत गोगावले हे दोघे देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले. शिंदे त्यानंतर मुख्यमंत्री झाले. मात्र शिरसाट व गोगावले सत्तेत मंत्री पदापासून सतत हुलकावणीच मिळाली.तेंव्हापासून शिरसाट यांनी कधी उघडपणे तर कधी संधी मिळेल त्यावेळी अप्रत्यक्षपणे सरकार विरोधात भूमिकाही मांडली.मात्र भरत गोगावले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विकास कामांना सतत मिळेल तसे बळ देत राहिल्याने आ.गोगावले यांनी मात्र मिळेल त्यात सुख मानत मुख्यमंत्री शिंदे यांची सातत्याने भालामणच करण्यात धन्यता मानली. मागील दोन वर्षात सातत्यान मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चा झाल्या.मंत्री मंडळात शिरसाट आणि भऱत गोगावले यांच्या नावावर प्रत्येक वेळी बराच खलही झाला.मात्र आता विधानसभेच्या आगामी निवडणुकीला अवघा महिनाभराचा अवधी शिल्लक राहिला असताना मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केल्याचे दिसून येत असून त्याच पार्श्वभूमीवर शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या आर्टिकल ऑफ असोशिएशन मधील आर्टिकल २०२ अन्वये ही निवड केल्याचे नगर विकास विभागाने म्हटले आहे.

आ.शिरसाट यांना जरी बाप्पा पावला असला तरी आ.गोगावले यांना मात्र पुन्हा एकदा सत्तेपासून हुलकावणी मिळाल्याचे स्पष्ट झाले.मग त्यातल्या त्यात हिंगोलीचे शिवसेनेचे माजी खा. हेमंत पाटील व एक कायम असंतुष्ट माजी खा.आनंदराव अडसूळ यांची मात्र अनुक्रमे हळद संशोधन मंडळ व राज्य एस.सी.एस.टी.आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांनाही राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यांत आला आहे.या अगोदर शिवसेनेचे अन्य एक नेते माजी आमदार रामदास कदम यांचा आमदार मुलगा योगेश कदम याची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष पदावर करण्यांत आली होती. आजच्या नियुत्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बाजी मारल्याचे स्पष्ट दिसून येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या पदरी मात्र निराशाच पडल्याचे ही चित्र स्पष्ट झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech