नवी दिल्ली – आतिशी मार्लेना यांनीही राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. तर आतिशी मार्लेना यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा सादर केला आहे. पक्ष आणि दिल्लीतील जनतेसाठी हा भावनिक क्षण आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची शपथ दिल्लीतील जनता घेत आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मी दिल्लीचा कारभार पाहीन आणि सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज, मंगळवारी दिल्लीचे राज्यपाल व्हीके सक्सेना यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला आहे.आप आमदारांनी सकाळी मंत्री आतिशी मार्लेना यांची नेतेपदी निवड केली आणि आता लवकरच त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राज्यपाल हाऊसबाहेर काहीच चर्चा केली नाही. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय म्हणाले की, अरविंद केजरीवाल आता लोकांमध्ये जातील आणि पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील. नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी राज्यपालांनी लवकरच तारीख द्यावी, असे ते म्हणाले. दरम्यान भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, जे काही चालले आहे त्याचा देशाला फायदा होणार नाही. त्यांना काम करावेसे वाटत नाही आणि केजरीवाल तुरुंगात असतानाही हे लोक चांगले काम करू शकले असते पण ते केले नाही. आतिशी मार्लेना नक्षलवादी विचारांच्या अनुयायी आहेत. सौरभ भारद्वाज त्यांची तुलना देवाशी करीत आहेत. एका भ्रष्ट व्यक्तीची तुलना देवाशी कशी करता येईल…? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.