अमरावती – राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, नका मात्र त्यांच्या जिभेला चटका द्या असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी केले. अनिल बोंडे यांच्या या खळबळजनक विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या वादग्रस्त विधानाबाबत अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल करत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी गुन्हा नोंद होईपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देईन, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. संजय गायकवाड यांच्या या विधानानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला असतानाच भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधींची जीभ छाटू नका, मात्र त्यांच्या जीभेला चटके द्या असे अनिल बोंडे म्हणालेत. अनिल बोंडे यांच्या या विधानानंतर अमरावतीमधील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बोंडे यांच्या विधानावरुन आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असे सवाल करत काँग्रेस खासदार बळवंत बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. जोपर्यंत कारवाई करत नाही, तोपर्यंत हलणार नाही, असे म्हणत आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी पोलीस आयुक्त आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आत्तापर्यंत याबाबत कारवाई व्हायला पाहिजे होती. आमच्याही नाकातोंडात पाणी जात आहे. प्रत्येक वेळेस असे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्हाला जेलमध्ये टाका, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली. गुन्हे दाखल करुन कागद आमच्याकडे द्या तोपर्यंत एकही कार्यकर्ता इथून हलणार नाही, रोज रोज आम्ही ऐकून घेणार नाही, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला.